डोंबिवली : – ( शंकर जाधव ) आगरी युथ फोरम डोंबिवली आयोजित आगरी महोत्सव एक वेगळ्या वळणावर चालला आहे. सर्वांना समाविष्ट करणारा महोत्सव असून त्याची व्याप्ती वाढली आहे. समाजाबरोबर इतर जातीही या महोत्सवाची वाट पहात असतात. आगरी समाजातील लाखो लोकांच महोत्सवाला सहकार्य मिळत असून आता शीख, मुस्लिम, जैन समाजही महोत्सवाकडे डोळे लाऊन पहात आहे. त्यामुळे आगरी महोत्सव आगरी समजापुरता मर्यादित राहिलेला नाही असे वक्तव्य फोरमचे अध्यक्ष गुलाबराव वझे यांनी केले.
पूर्वेकडील सुरभी हॉल येथे आयोजित 16 व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत वझे बोलत होते. यावेळी पांडुरंग म्हात्रे, शरद पाटील, दत्ता वझे, रामकृष्ण पाटील, प्रभाकर चौधरी, जालंदर पाटील, दिलीप नाईक, रंगनाथ ठाकूर, विजय पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते. आगरी महोत्सवाचे रविवार 9 डिसेंबर रोजी खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, कडोंमपा महापौर विनिता राणे यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सायंकाळी 6.30 वाजता पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने पु. ल. व्यक्तीमत्वाचा शोध या विषयावर होणाऱ्या परिसंवादात साहित्यिक श्याम भुर्के, डॉ. प्रकाश पायगुडे सुरेश देशपांडे सहभागी होणार आहेत. मंगळवार 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता भजनसंध्या कार्यक्रमात महादेवबुवा शहावाजकर, शंकुबुवा पडघेकर, अनंतबुवा भोईर, नंदकुमार पाटील आदी भजनसम्राट सहभागी होणार आहेत. 7.15 वाजता आगरी समाज आणि अध्यात्म या विषयावर मान्यवर हभप महाराजांचे चर्चासत्र होणार आहे. बुधवार 12 डिसेंबर रोजी आरोग्य विषयक शासनाचे विविध उपक्रम या चर्चासत्रात डॉ. संजय ओक, डॉ. मुकुंद तायडे, डॉ. संजय सुरासे, डॉ. प्रवीण बांगर, डॉ. गुरुनाथ खानोलकर, डॉ. दिनेश म्हात्रे सहभागी होणार आहेत. गुरवार 13 डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठाची भविष्यातील वाटचाल एक दृष्टीझेप या विषयावर मुंबई विद्यापीठ कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, डॉ. नरेंद्रचंद्र, डॉ. अशोक महाजन, डॉ. सुरेश उकरांडे, डॉ. अजय भामरे सहभागी होणार आहेत. शुक्रवार 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:00 वाजता महिला विशेष दिन म्हणून गाथा स्त्री शक्तीची विषयावर व्याख्यान सहभाग माधवी घारपुरे, दिपाली काळे, वृषाली पाटील, रेखा पुणेतांबेकर, प्राची गडकरी तर शनिवार दि. 15 डिसेंबर रोजी कायदा व सुव्यवस्था चर्चासत्रात पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, प्रताप दिघावकर, रविंद्र शिसवे, संजय शिंदे आणि कायदेतज्ञ अॅड. शिवराम गायकर सहभागी होणार आहेत. रविवारी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता होणार आहे, अशी माहिती पुढे दिली.