मुंबई : वाळू उत्खनन बंदी काळात बेकादेशीररित्या,अनियमित,प्रमाणापेक्षा अधिक वाळू उपसा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे गृह राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
वाळू उपशासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री.केसरकर बोलत होते. मेरीटाईम बोर्डाने गेल्या वर्षी ज्या अनियमितता झाल्या आहेत, ते सर्व क्रमांक वगळून उर्वरित सर्वेक्षणाचा अहवाल आठ दिवसांच्या आत सादर करावा. हातपाटी स्ट्रोक,डुबी या पद्धतीने वाळू उपसा करणाऱ्यांचा दर काय असावा, या संदर्भात शासन लवकरच निर्णय घेईल. सध्या कोकणामध्ये हात पाटीची वाळू उत्खनन बंद असून या बंद दरम्यानच्या काळात काही पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहेत का, हे तपासून निर्णय घेण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ड्रेजिंग करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला पर्यावरण मूल्यांकन अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यासाठी आवश्यक असणारा निधीही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असेही श्री.केसरकर यांनी सांगितले.
यावेळी आमदार वैभव नाईक,अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी,महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे जल आलेखक कमांडर संदीप कुमार,सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी अध्यक्ष काका कुडाळकर, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे महेश कांदळगावकर आदी उपस्थित होते.