नवी मुंबई : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने दारूच्या नशेत 3 मित्रांनी मित्राची सोनसाखळी चोरून त्याला वाशी पुलावरून खाडीत फेकून दिले. ही धक्कादायक घटना 2 डिसेंबर 2018 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी प्रथमत: वाशी पोलीस ठाण्यात तरुण पाण्यात पडल्या प्रकरणी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली हेती. मात्र तरुणाच्या मित्रांच्या बोलण्यातून संशय व्यक्त झाल्याने सदर प्रकरण गोवंडी पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आले. गोवंडी पोलिसांनी उत्तमरीत्या तपास करून 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले तर दोन जणांना बेड्या ठोकल्या.
गोवंडी परिसरातील आनंदनगर येथे राहणारा राजू गायकवाड (35) हा वाशी पुलावरून खाडीत पडल्याची माहिती राजूच्या भावाला मित्र अविनाश ढिलपे याने दिली. भाऊ खाडीत पडल्याचे समजताच विजय गायकवाड याने वाशी पोलीस ठाणे गाठले. 3 डिसेंबर 2018 रोजी पोलिसांनी या प्रकरणी 74/18 नुसार मीसिंगची नोंद केली. मात्र घटनास्थळी त्यावेळी उपस्थित असलेले राजूचे मित्र दिशाभूल करत असल्याचे वाशी पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे सदर प्रकरणी गोवंडी पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आले. गोवंडी पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच अल्पवयीन मुलासह अविनाश ऊर्फ टप्पू अर्जुन ढिलपे (26), कृष्मा ऊर्फ चाम्या सुतार (19) यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
2 डिसेंबर रोजी चौघांनी गोवंडी रेल्वेस्थानकासमोरील बारमध्ये दारू प्राशन केली. मात्र दारूची तलफ न शमल्याने राजूकडे तिघांनी दारूसाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी राजूच्या कानातील सोन्याची बाली खेचली. या प्रकरामुळे राजू संतापला. पोलिसांत तक्रार करण्याची धमकी त्याने मित्रांना दिली. त्यामुळे भेदरलेल्या मित्रांनी राजूची समजूत काढत त्याला दुचाकीवर बसवून वाशी पुलावर आणले. तेथे आल्यावर राजूच्या गळ्यातील सोनसाखळी घेचून त्याला पुलावरून खाडीत फेकून दिले. त्यामंतर तिघांनी राजू खाडीत पडल्याचा बनाव केला होता, अशी माहिती तपासादरम्यान उजेडात आली. दरम्यान, 9 डिसेंबर रोजी राजूची मृतदेह पोलिसांनी खाडीतून बाहेर काढला.
या प्रकरणी (गु. र. क्र. 278/18) भादंवि कलम 302, 364, 394, 34 नुसार गुन्हा दाखल करून अविनाश ऊर्फ टप्पू अर्जुन ढिलपे, कृष्णा ऊर्फ चाम्या सुतार यांना अटक केली तप अल्पवयीन मुलाची रवानगी डोंगरी येथे केली. अविनाश व कृष्णा यांना न्यायालयाने 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोनि विलास धायगुडे करत आहेत.
या खुनाचा उलघडा परिमंडळ 6 चे उपायुक्त शहाजी उमाप, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विलास धायगुडे, गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव व पथकाने केली.