महाराष्ट्र

स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरातील पर्यटनस्थळांचे गुजरात आणि महाराष्ट्र सरकारमार्फत तयार होणार सर्किट – पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा प्रस्ताव

मुंबई, दि. 14 : गुजरात आणि महाराष्ट्र सरकारने मिळून जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरातील मणिबेली,मांडवा, गमन, प्रकाशा, सारंगखेडा,तोरणमाळ, उषा पॉईंट आदी पर्यटनस्थळांचे सर्किट करावे, असा प्रस्ताव राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी गुजरात सरकारसमोर ठेवला आहे.

नर्मदेच्या काठी असलेल्या गमन या आदिवासी गावात लवकरच आदिवासी ग्रामच्या धर्तीवर रिसॉर्ट उभारून गमन ते स्टॅच्यू ऑफ युनिटीदरम्यान मोटार बोट सेवाही सुरू करण्याच्या सूचना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी नंदुरबार जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

गुरुवारी आणि शुक्रवारी मंत्री श्री. रावल यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी नर्मदा सरोवर सर्किट हाऊसमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात सरकारमधील अधिकाऱ्यांशी श्री. रावल यांची बैठक झाली. नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी,पोलीस अधीक्षक संजय पाटील,नर्मदा विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंते श्री. सोनवणे,तहसीलदार नितीन देवरे, बडोदाचे पोलीस अधीक्षक राजेंद्र चुडासामा,माजी महापौर राजेंद्र सिंह राठोड आदींसह वन विभाग, गुजरात व महाराष्ट्र पर्यंटन, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे नर्मदा काठच्या गावांना प्रगतीचे नवे दालन उपलब्ध झाले आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना आणि आदिवासी गावांना व्हावा. आदिवासी तरुणांना किमान कौशल्य कार्यक्रमाअंतर्गत हॉस्पिटॅलिटी,पर्यटन रोजगार संबंधी प्रशिक्षण देण्यात यावे, अशी इच्छा मंत्री श्री. रावल यांनी व्यक्त केली आहे.

गमन ते स्टॅच्यू ऑफ युनिटी हाऊस बोट सेवा, बोट रेस्टॉरंट, ट्रायबल व्हिलेज रिसॉर्ट उभे करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जागची ते मणिबेली रस्ते कामाची सुरुवात लवकरच केली जाणार आहे. महाराष्ट्र सदनच्या धर्तीवर स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ रिसॉर्ट उभे करता यावे यासाठी गुजरात सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी. परिसरात रस्त्यांचे जाळे उभे करावे, दूरसंचार सुविधा उभ्या कराव्या, अशा सूचना मंत्री श्री. रावल यांनी या बैठकीत केल्या.

या दौऱ्यांत श्री. रावल यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. जलविद्युत प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!