मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमाचा शुभारंभ
मुंबई दि. 19 : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रयोगशील शेतीबाबत प्रशिक्षण मिळणार आहे. हा उपक्रम पथदर्शी प्रकल्प ठरणार असून यामुळे शेती क्षेत्रात परिवर्तन घडण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी कुशल प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. त्यावेळी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील,जलसंधारण सचिव एकनाथ डवले, कौशल्य विकास सचिव असीम गुप्ता, कौशल्य विकास आयुक्त विरेंद्र सिंह, पॅलेडिअम कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कंट्री डायरेक्टर श्रीमती बार्बरा, एसआयएमएसीईएस एलएलपीचे श्री. निंबाळकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,शेतकऱ्यांना कृषी आधारित कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्यामुळे गावामध्येच रोजगार निर्मिती होण्याबरोबर शेतकऱ्यांच्या कुटुंबातील तरुण तरुणींना याचा प्रत्यक्ष लाभ घेण्यास मदत होणार आहे. स्व. नानाजी देशमुख कृषी साह्य योजना आणि ॲग्री बिझनेस याबाबत माहिती मिळविणे, या योजनांचा लाभ घेणे, शेती बाजाराशी समन्वय करणे आणि शेतीतील उत्पादकता वाढविणे या प्रशिक्षण कार्यक्रमातून शक्य होणार आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी कुशल प्रशिक्षणामुळे गटशेतीतून कौशल्य विकास करणे शक्य होणार आहे.
प्रगत तंत्रज्ञान आधारित शेती पद्धतीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणे शक्य होणार आहे. गेल्या काही वर्षात शेतीमध्ये होत असलेले बदल, पावसाची अनियमितता यामुळे शेतीची शाश्वतता कमी होत आहे. पिके चांगली येण्यासाठी वापरण्यात येत असलेली अधिकची रासायनिक खते,वाढलेले बाजारभाव हे सगळे पाहता कृषी क्षेत्रात प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. कौशल्य विकास विभागामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामुळे शाश्वत शेतीकडे आपल्याला जाणे शक्य होणार आहे, असे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य आधारित प्रशिक्षण दिले जाणार असून याचा लाभ जवळपास तीन लाख युवकांना होणार आहे. राज्यातील शेतकरी आणि तरुणांसाठी स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरिता संधी निर्माण होण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याचे कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.
श्री. फडणवीस यांनी आज या प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ केला असून त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण घेणारे यामध्ये सहभागी झाले होते.