ठाणे महाराष्ट्र

शेतकरी, गरीबांसाठी सरकारचा ‘सबका साथ सबका विकास’वर भर – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

सिडकोची भव्य गृहनिर्माण योजना, ठाणे मेट्रोचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

ठाणे,  दि. १८ : आमचे सरकार’सबका साथ सबका विकास’ यासाठी विकासाच्या पंचसूत्रीची अंमलबजावणी करीत असून मुलांना शिक्षण, तरुणांना रोजगार,शेतकऱ्यांना सिंचन, ज्येष्ठांना औषधी आणि सर्वसामान्यांना त्यांचे जीवन सुखी करण्यावर आमचा भर राहणार आहे असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कल्याण येथे जाहीर सभेत सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राने पायाभूत सुविधांमध्ये घेतलेल्या आघाडीबद्दल मुख्यमंत्र्यांचे तसेच महाराष्ट्राचे कौतुक केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी डोंबिवली ते तळोजा या मेट्रो मार्गाची तसेच वसई-विरार आणि नाशिकमध्येही मेट्रोचे मार्ग निर्माण करून एकात्मिक परिवहन प्रणाली विकसित केली जाईल अशी घोषणा केली. घरबांधणीसाठी ‘ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेन्ट’ धोरणावर भर दिला जाईल असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिडकोतर्फे बांधण्यात येणाऱ्या ८९,७७१ घरांच्या भव्य गृहनिर्माण योजनेचे त्याचप्रमाणे ठाणे–भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग ५ व दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर या मेट्रो मार्ग ९ चे भूमिपूजन झाले, त्यावेळी ते बोलत होते. कल्याणच्या वासुदेव बळवंत फडके मैदानावर आज दुपारी या भूमिपूजन कार्यक्रमास व्यासपीठावर राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी , केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई उपनगरचे पालकमंत्री  विनोद तावडे,बंदरे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, गृह राज्य मंत्री रणजीत पाटील, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,खासदार कपिल पाटील, आमदार मंदा म्हात्रे, नरेंद्र मेहता, मनीषा चौधरी,  राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार,आमदार, एमएमआरडीए महानगर आयुक्त आर राजीव, प्रवीण दराडे उपस्थित होते.

याप्रसंगी सिडकोच्या आवास योजनेतील एजाज अहमद, सतीश माने, मीना सूरकामे, त्रिवेणी नाईक,श्रीमती गावित यांना प्रातिनिधिक स्वरूपात घराची कागदपत्रे देण्यात आली. यावेळी प्रधानमंत्री मोदी  यांना वारली चित्र भेट म्हणून देण्यात आले. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रिमोट कंट्रोल द्वारे मेट्रो आणि घरबांधणी प्रकल्पांचे भूमिपूजनही करण्यात आले.

२७५ किमी मेट्रोचे जाळे पसरविणार

प्रधानमंत्री यांनी आपल्या भाषणाची सुरुवार मराठीत करताना छत्रपती शिवराय, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आबेडकर, महात्मा फुले यांचे स्मरण केले. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकाराम यांच्यापर्यंत अनेक संतांनी भक्तिमार्गाने लोकांना जोडण्याचे काम केले आहे असे सांगून त्यांना प्रधानमंत्र्यांनी वंदन केले तेव्हा टाळ्यांचा एकच गजर झाला. ते पुढे म्हणाले की, मुंबई ,ठाणे ही लोकांची स्वप्ने पूर्ण करणारी आणि संपूर्ण देशाची एक प्रतिमा उमटविणारी शहरे आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून येथील सोयीसुविधांवर मोठा ताण पडत असल्याची खंत व्यक्त करून ते म्हणाले की, पूर्वीच्या शासनात तब्बल ८ वर्षे प्रतीक्षेनंतर २०१४ मध्ये मेट्रोचा पहिला मार्ग खुला झाला तो देखील ११ किमी एवढाच, त्या तुलनेत आम्ही २०२२ पर्यंत २७५ किमी एवढे मेट्रोचे जाळे पसरवित आहोत.

देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करीत असेल तेव्हा देशातील प्रत्येक दुर्बल व्यक्तीकडे स्वत:चे घर असेल यादृष्टीने आम्ही वाटचाल करीत असून जगातील सर्वात झपाट्याने विकसित होणारी पहिली दहा शहरे भारतातील आहेत ही आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे असे ते म्हणाले.

पूर्वीच्या सरकारने २५.५० लाख घरे बांधली ,आम्ही केवळ ४ वर्षांत १ कोटी २५ लाखांपेक्षा जास्त घरे बांधली. गरीब व दुर्बल घटकाला आज घरासाठी आर्थिक सहाय्यही आम्ही सहजपणे उपलब्ध करून दिले आहे.महाराष्ट्रात ८५ हजारपेक्षा जास्त लोकांना २ हजार कोटींची मदत केली आहे, असेही ते म्हणाले.

बांधकाम क्षेत्रावर नियमन आणणारा रेरा कायदा देशात महाराष्ट्राने सर्वप्रथम राबविला व त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. २७ हजार रिअल इस्टेट एजंट याखाली नोंदणीकृत झाले ही मोठी गोष्ट आहे असे सांगून प्रधानमंत्री मोदी यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

३० कोटी पेक्षा जास्त एलईडी बल्ब देशात वाटप झाले असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात यामुळे ११०० कोटी रुपयांची वीज वाचली. उज्ज्वला योजनेत ६ कोटी गॅस जोडण्या दिल्या असून महिलांचे जीवन सुकर झाले आहे. मुद्रा योजनेच्या राज्यातील अंमलबजावणीमुळे अनेक महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली  असेही ते म्हणाले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!