मुंबई, दि. २१ : पर्यटकांना सौंदर्याची अनुभूती, सुविधाजनक निवासी व्यवस्था आणि मनोरंजन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) आता पौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. एमटीडीसीतर्फे महामंडळाच्या राज्यातील २३ रिसॉर्टस् मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. विविध रिसॉर्टस्मध्ये दर महिन्याला पौर्णिमेच्या दिवशी पर्यटकांना या महोत्सवाचा आनंद घेता येईल, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
दरवर्षी विविध ठिकाणी असलेल्या या रिसॉर्टस्मध्ये लाखो पर्यटक भेट देतात. एमटीडीसीच्या रिसॉर्टस्मध्ये दर महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी आता पर्यटक सांस्कृतिक कार्यक्रम आणि साहित्य महोत्सवाचा आनंद घेऊ शकतात आणि महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि वारसा जाणून घेऊ शकतात. या उपक्रमामुळे कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होईल आणि त्याचबरोबर राज्याचा समृद्ध वारसा आणि संस्कृतीक जतन करण्यासही मदत होईल, असे मंत्री श्री.रावल यांनी सांगितले.
मंत्री श्री.रावल यांच्या हस्ते उद्या २२ डिसेंबर रोजी ताडोबा रिसॉर्ट येथे पौर्णिमा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक हरिष इथापे उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात कवी संदीप खरे, अरुणा ढेरे, ना. धों. महानोर आणि फादर फ्रान्सिस दिब्रेटो आपल्या साहित्यकृती सादर करून आपल्या देशाचे सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन घडवतील.
ताडोबा येथे २२ डिसेंबर २०१८ रोजी हरिष इथापे सादरीकरण करतील. संदीप खरे हे २१ जानेवारी २०१९ रोजी कुणकेश्वर येथे, अरुणा ढेरे ह्या १९ फेब्रुवारी २०१९ रोजी पानशेत येथे, २१ मार्च २०१९ रोजी ना. धों. महानोर हे अजिंठा येथे, १९ एप्रिल २०१९ रोजी फादर फ्रान्सिस दिब्रेटो हे माळजेज घाट येथे तर १८ मे २०१९ रोजी रामटेक येथे डॉ.पंकज चांदे आपल्या साहित्यकृती सादर करतील. प्रत्येक गटातील कलाकार आपल्या साहित्यकृतीतून व्यक्त होतील आणि त्या कलाप्रकाराचे कालातीत महत्त्व पुनरुज्जीवित करतील. या ठिकाणी दर्जेदार सादरीकरणे आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर होतीलच, त्याचबरोबर या माध्यमातून महाराष्ट्रात दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत भर पडावी यासाठी एक वाट निर्माण होईल.
एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले की, पर्यटकांना महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा यांची ओळख करून देण्याच्या उद्दिष्टाने २३ रिसॉर्टस्मध्ये पौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील वैविध्यपूर्ण साहित्य प्रकार,लोकसाहित्य, लोकसंगीत, लोककला, संस्कृती आणि परंपरांसाठी प्रेरणा, प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे प्रदर्शन घडविण्यात येईल.