गुन्हे वृत्त

दाऊदच्या टोळीतील गँगस्टरला मुंब्र्यातून अटक.

ठाणे :- कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम टोळीतील गँगस्टर मोहम्मद खान महाडिक याला ठाणे गुन्हे शाखेने मुंब्रा येथून जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी पत्रकार परिषदेत  दिली.

त्याच्यावर हैदर या गँगस्टरच्या खुनासह १४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

हैदरअली या गँगस्टरचा खून करुन गेल्या २८ वर्षांपासून पसार झालेल्या दाऊदच्या टोळीतील महंमद अहंमदखान महाडीक (५७, रा. मुंब्रा ) याला ठाणे गुन्हे अन्वेषण  विभागाच्या युनिट एकने मुंब्रा भागातून सोमवारी अटक केली.

त्याच्याविरुद्ध खून , खूनाचा प्रयत्न आणि खंडणी उकळणे असे गंभीर स्वरुपाचे १४ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.

मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार हा अलिकडेच मस्कट येथून मुंब्रा भागात त्याच्या पत्नीसह वास्तव्याला आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना मिळाली होती. तिच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अपर पोलीस आयुक्त प्रविण पवार आणि उपायुक्त देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, रणवीर बयेस आणि अहिरराव आदींच्या पथकाने त्याला मुंब्रा, कौसा भागातील सिमला पार्कमधील अमरेश पार्क या इमारतीमधून ताब्यात घेतले.

‘टाडा’ आणि ‘मिसा’ या कायद्यांतर्गतही त्याच्यावर कारवाई झाली होती. अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रीया टाळण्यासाठी तो भूमीगत झाला होता.खून, खनाचा प्रयत्न आणि खंडणीच्या गुन्हयात तो जामीनावर सुटल्यानंतर त्याने मस्कटमध्ये पलायन केले होते. बैंगलोर येथे पठाण युसूफखान उस्मान (रा. उत्तर कनडा, कर्नाटक) या बनावट नावाने आणि पत्याने त्याने बनावट पासपोर्ट तयार केला होता. त्याआधारे २००० ते २०१६ या काळात तो मस्कटमध्ये पसार झाला होता. गेल्या २८ वर्षांपासून पसार असलेला हा रेकॉर्डवरील गँगस्टर महंमद महाडीक खोटे नाव धारण करुन मुंब्य्रातील कौसा भागात वास्तव्य करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती.

त्याला कौसा भागातून पासपोर्टसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने जोसेफ या मित्राच्या मदतीने कर्नाटक येथून खोटे नाव आणि पत्ता देऊन बनावट पासपोर्ट तयार केल्याचे आणि न्यायालयीन प्रक्रीया टाळण्यासाठी पसार झाल्याची कबूली पोलिसांना दिली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!