महाराष्ट्र

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ ही त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 25 : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला विकासाची दिशा दिली. भारतातील प्रत्येक व्यक्तीपर्यॅत शिक्षण पोहोचावे हे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या जयंतीदिनी राज्यात महाराष्ट्र शिक्षण मंडळाअंतर्गत  भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ होत आहे. ही त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाअंतर्गत राज्यातील 13 भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वंदना कृष्ण, आयुक्त विशाल सोळंखे, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे संचालक सुनिल मगर, शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर, शिक्षणतज्ञ सोनम वांचुक, सुलेखनकार अच्युत पालव उपस्थित होते. सदस्य स्वरूप संपत, प्राची साठे, फ्रान्सीस जोसेफ यांना अभ्यासक्रम निर्मितीतल्या सहभागाबद्दल गौरविण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, अटलजींनी विविध क्षेत्रात सर्व पद्धतीने विकास करून खऱ्या अर्थाने देशाचा विकास दर वाढविला आहे. त्यांच्या जयंतीनिदिनी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ ही गौरवास्पद बाब आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये आमुलाग्र परिवर्तन घडवून राज्य शिक्षण क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर आणत प्रगती साधली आहे. महाराष्ट्र आंतराष्ट्रीय शिक्षण  मंडळाअंतर्गत सुरू झालेल्या शाळेचा अभ्यासक्रम संशोधन पद्धतीचा आहे. ज्यांनी देशातील विकासात आमुलाग्र बदल घडविण्यात सहभाग दिला अशा तज्ज्ञांच्या सहाय्याने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. व्यक्तीची क्षमता समजून प्रत्येक क्षमतेला वाव देणारी शिक्षण पद्धती तयार करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. तसेच जागतिक स्तराचे ज्ञान असलेला विद्यार्थी तयार व्हावा यासाठीचे प्रशिक्षण, त्यासाठीची क्षमता निर्मिती करण्यासंदर्भातले धोरण मंडळाने तयार केले आहे. देशाला उत्तम योगदान देणारे विद्यार्थी या शाळेतून घडविण्यात येणार असल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले.

शिक्षण विभागाच्या शैक्षणिक बदलांबाबत गौरवोद्गार काढताना मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये क्षमता प्रचंड असून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे होते. शिक्षण विभागाने परिवर्तन घडवून आणल्यामुळे आज विद्यार्थ्यांची शिक्षण क्षमता 100 टक्के झाली आहे. लाखो शिक्षक तंत्रस्नेही असून त्यांनी 8 हजार ॲप तयार करून शिक्षणात आमुलाग्र योगदान दिले आहे. यामुळे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरीत होत आहेत. हा शैक्षणिक क्षेत्रात मोठा बदल असल्याचेही त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षणमंत्री श्री.तावडे म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण मिळावे यासाठी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग यांच्या शाळांमधून 13 शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्याथ्याची गुणवत्ता सिद्ध करणारा हा शिक्षणक्रम तयार करण्यात आला आहे. पुढच्या वर्षी 100 शाळांमध्ये हा शिक्षणक्रम राबविण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांची आवड ओळखून त्या क्षेत्रात त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न या शाळांमधून करण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षकांची निवड करण्यात आली असून, जागतिक स्पर्धेत स्थान प्रस्थापित करणारा विद्यार्थी या शाळांमधून घडणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मानव श्री.जावडेकर म्हणाले, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्व शिक्षा अभियानास सुरुवात केली. त्यांच्या जयंतिनिमित्त आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ म्हणजे त्यांचे अभियान खऱ्या अर्थाने सार्थक करणे होय. पारंपरिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना न देता कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम हे या शिक्षण मंडळाचे वैशिष्ट्य आहे. ऑपरेशन डिजिटल बोर्ड ही संकल्पना पुढील तीन वर्षांत ९ वी ते १५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी १५ लाख वर्ग खोल्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

श्रीमती पंकजा मुंडे म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या प्रगतीत शिक्षणाचा मोठा वाटा असतो आणि हसत खेळत शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे. गुणांचा आणि कौशल्याचा विकास , बुद्धीवर्धन अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था शिक्षण विभाग करीत आहे, असे सांगून श्रीमती मुंडे यांनी शिक्षण विभागाचे अभिनंदन केले.

या डिजिटल शुभारंभावेळी संबंधित अधिकारी, विविध शाळांचे विद्यार्थी आणि राज्यातील १३ विविध ठिकाणी विद्यार्थी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित होते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!