अलिबाग : (जिमाका) दि.27- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत गोवर रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. दरम्यान मंगळवार (दि.27 नोव्हेंबर) ते बुधवार (दि.26 डिसेंबर) अखेर या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 5 लाख 25 हजार 536 बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. या अभियानात रायगड जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 7 लाख 93 हजार 451 बालकांना या लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार बुधवार दि.26 डिसेंबर रोजी दिवसअखेर जिल्ह्यातील 68 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 17 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 1 हजार 357 विद्यार्थ्यांना तर 51 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 8हजार 861 विद्यार्थ्यांना अशा एकूण 10 हजार 218 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. तर आज अखेर एकूण 2 लाख 72 हजार 715 मुले व 2 लाख 52 हजार 821 मुली असे एकूण 5 लाख 25 हजार 536 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. हे लसीकरण राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणा आतापर्यंत जिल्ह्यातील 5130 शाळांपर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे.
गोवर रुबेला लसीकरण मोहिम : जिल्ह्यात 5 लाख 25 हजार बालकांना लसीकरण
