ठाणे

मतदारांमध्ये विश्वास वाढविण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्रे आता नागरिकांनाही दाखविणार – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ——जिल्ह्यात २७ डिसेंबरपासून सुसज्ज वाहनांमधून जनजागृती मोहीम

ठाणे  : आगामी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने व्हीव्हीपॅट यंत्रे नक्की कशी काम करतात तसेच या यंत्रांच्या वापराविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात २७ डिसेंबरपासून सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना प्रत्यक्ष ही यंत्रे दाखवून त्याविषयीची माहिती कुशल प्रशिक्षकांमार्फत देण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदारांना त्यांनी केलेले मतदान त्याच उमेदवारास झाल्याची खात्री त्याच ठिकाणी करता येते. यासंदर्भात आज एका पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या जनजागृती मोहिमेची माहिती दिली. यावेळी निवडणूक विभागाचा प्रभारी कार्यभार सांभाळणारे उपजिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे, तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील आदींची उपस्थिती होती.

*7361 व्हीव्हीपॅट यंत्रे*

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी ठाणे जिल्हयास भारत इलेकट्रॉनिकस्‍ या कंपनीचे 12,659 मतदान यंत्र, 7361 नियंत्रण यंत्र व 7361 व्होटर व्हेरिफाईबल पेपर ऑडिट व्हीव्हीपॅट एवढया मशिन प्राप्त झाल्या असून गेल्या दोन महिन्यात राजकीय प्रतिनिधीसमोर त्यांची समाधानकारक चाचणी करण्यात आली आहे

ही यंत्रे सध्या अन्नधान्य गोदाम कोपरी ठाणे (पूर्व) येथे ठेवण्यात आली असून २६ डिसेंबर रोजी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसमोरच त्यातील निर्दोष असणारी १० टक्के निवडक यंत्रे जनजागृती मोहिमेसाठी बाहेर काढण्यात येतील. उर्वरित यंत्रे सीलबंद स्वरूपात गोदामातच सुरक्षित असतील.

*सुसज्ज वाहने फिरणार*

प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २ या हिशेबाने १८ विधानसभा मतदारसंघांसाठी ३६ आणि एक जिल्हाधिकारी कार्यालयासाठी अशी ३७ वाहने जिल्ह्यात फिरणार आहेत.

विशेष म्हणजे या वाहनांवर जीपीएसची व्यवस्था आहे, जेणेकरून ही वाहने कुठे आहेत त्याचा मागोवा घेता येईल. या प्रत्येक वाहनात एक व्हीव्हीपॅट यंत्र, एलईडी, स्पीकर्स, माहिती देणारे फ्लेक्स तसेच एक प्रशिक्षित कर्मचारी/तंत्रज्ञ, एक पोलीस कर्मचारी असेल. ज्या ज्या ठिकाणी हे वाहन फिरणार आहे त्यात्या ठिकाणी आगाऊ सुचना तेथील नागरिकांना देण्यात येतील, जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या यंत्राविषयी माहिती कळेल.

*शंकांचे समाधान करा*

पुढील ६० ते ६५ दिवस ही जनजागृती मोहीम सुरु असून नागरिकांनी व्हीव्हीपॅटच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेण्याचे तसेच कुठल्याही शंका असतील तर त्याचे समाधान करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केले आहे.

*राजकीय पक्षांना एजंट नेमण्याचे आवाहन*

सध्या मतदार यादी जास्तीत जास्त अचूक आणि निर्दोष असावी याची काळजी घेण्यात येत असून यासाठी ब्लॉक पातळीवरील अधिकारी काम करीत आहेत. परंतु राजकीय पक्षांनी देखील प्रेत्येक ब्लॉकमध्ये त्यांचे एजंट्स नेमल्यास दोघांच्या समन्वयाने मतदार यादी अचूक बनविण्याचे काम सहज करता येईल असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी १०६९ एजंट्स नावे पक्षांकडून प्राप्त झाली असून ६ हजार ४८८ मतदान केंद्रांसाठी तितकेच एजंट आवश्यक आहेत असे सांगितले.

*सी व्हिजिल मोबाईल एप*

निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये तसेच निष्पक्ष, निर्भीड वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात म्हणून सी व्हिजिल मोबाईल एपचा परिणामकारक उपयोग करण्याच्या सुचना दिल्या आहेत. ज्यायोगे सर्वसामान्य जनतेला देखील त्यांचा स्मार्ट फोन वापरून या एपच्या माध्यमातून काही विपरीत व आक्षेपार्ह घडत असेल तर त्याची माहिती, छायाचित्रे तत्काळ निवडणूक मुख्य नियंत्रण कक्षाला पाठविता येतील. या यंत्रणेचा चांगला उपयोग जिल्ह्यात करण्यात येणार आहे असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!