अलिबाग : (जिमाका) दि.27:- वाशी खारेपाट विभागात मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यमातून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम होत असल्याने या परिसरातील नागरिकांना पिण्याचा पाण्याचा मुबलक व नियमित पुरवठा होईल. या परिसरातील काही गावे या योजनेपासून वंचित असतील तर अशा वंचित गावांपर्यंत पाणी पोहचविण्यासाठी जादा निधीची उपलब्धता करु, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज वाशी ता. पेण येथे केले.
खारेपाट विभागाच्या हेटवणे-शहापाडा-वाशी येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यमातून होणाऱ्या नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ ना. चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
वाशी ता.पेण येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास सिडकोचे अध्यक्ष तथा पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर,पेण च्या नगराध्यक्ष श्रीमती प्रितम पाटील, वाशी ग्रामपंचायतीचे सरपंच वरक पाटील, वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल, जिल्हा नियोजन समिती सदस्य किशोर जैन, वैकुंठ पाटील, नरेश गावंड, ॲड. महेश मोहिते, पेणच्या उपविभागीय अधिकारी श्रीम.प्रतिमा पुदलवाड आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.चव्हाण उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, पेण तालुक्यातील पाण्याचे स्त्रोत वाढविण्यासाठी या परिसरातील तलावातील गाळ काढण्याची कामेही लोकसहभागातून झाली आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून खारेपाट परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा, डिजीटल इंडिया अंतर्गत इंटरनेट सुविधा, पायाभुत सुविधा निर्मिती, समुद्राच्या उधाणाचे पाणी येथील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत येऊ नये यासाठी खारबंदिस्ती करणे आदी उपाययोजना केल्या जातील असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला खारेपाट विभागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी निधी उपलब्धता करु- पालकमंत्री ना. चव्हाण
