डोंबिवली :-( शंकर जाधव ) हरिद्वार हे सिंधी समाजाचेही श्रद्धास्थान असून सिंधी बांधव आपल्या वार्षिक उत्सवासाठी, तसेच वर्षभर मोठ्या प्रमाणावर हरिद्वारला जातात. मुंबईहून हरिद्वारला जाण्यासाठी सध्या लोकमान्य टिळक टर्मिनस-हरिद्वार सुपरफास्ट एक्स्प्रेस ही गाडी उपलब्ध असून सिंधी समाजाचे दैवत असलेले भगवान झुलेलाल यांचे नाव या गाडीला देण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. तसेच, लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्स्प्रेसला कल्याण येथे थांबा देण्याची मागणीही खा. डॉ. शिंदे यांनी केली.
उल्हासनगर येथे सुमारे चार लाखांहून अधिक सिंधी बांधव राहातात. ते दरवर्षी विविध धार्मिक कार्यासाठी, तसेच वार्षिक उत्सवासाठी हरिद्वारला जातात. भगवान झुलेलाल हे या समाजाचे दैवत असून लोकमान्य टिळक टर्मिनस – हरिद्वार गाडीचे नामकरण झुलेलाल एक्स्प्रेस करण्यात यावे, अशी या समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यासंदर्भात यापूर्वी रेल्वे मंत्रालयाशी आपण पत्रव्यवहारही केला होता, असे खा. डॉ. शिंदे यांनी रेल्वेमंत्री गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले. या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन गोयल यांनी खा. डॉ. शिंदे यांना दिले आहेत्याचप्रमाणे उत्तर भारतीय बांधवांची वस्ती मोठ्या प्रमाणावर दिवा, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, शहाड,मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, वांगणी, वासिंद आदी उपनगरांमध्ये आहे. परंतु, लोकमान्य टिळक टर्मिनस –गोरखपूर गाडीला ठाणे आणि कल्याण या दोन स्थानकांपैकी कुठेही थांबा नाही. लोकमान्य टिळक टर्मिनसनंतर ही गाडी थेट इगतपुरी येथे थांबत असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होते. ही बाब रेल्वेमंत्री गोयल यांच्या निदर्शनास आणून देत खा. डॉ. शिंदे यांनी या गाडीला कल्याण स्थानकात थांबा देण्याची आग्रही मागणी केली. याही मागणीचा सकारात्मक विचार करण्याची ग्वाही गोयल यांनी दिली.