नवी दिल्ली, दि. 27 : महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांची आज दिल्लीस्थित राज्य माहिती व जनसंपर्क संघटनेच्या (सिप्रा) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात आज’सिप्रा’च्या सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी ही निवड करण्यात आली. येत्या आठवड्यात कार्यकारिणीच्या अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
सिप्रा ही संघटना दिल्लीत जवळपास15 वर्षांपासून कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांना राष्ट्रीय स्तरावर मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांकडून शासनातील प्रभावी जनसंपर्कासाठी वापरण्यात येणारे विविध माध्यम यावर चर्चा करण्यात येते. विविध राज्यांच्या चांगल्या कार्याचा गौरव व विचारांची देवाणघेवाण करणे आदी काम सिप्रा संघटनेच्या माध्यमातून करण्यात येते.
सिप्राच्या सर्वसाधारण बैठकीत छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र,गुजरात, पश्चिम बंगाल, बिहार आणि राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे दिल्लीस्थित अधिकारी उपस्थित होते.