मुंबई : प्रवासादरम्यान रेल्वेत विसरलेले 6 लाख 20 हजार रुपयांचे 180 ग्रॅम सोने-चांदीचे दागिने महिलेला परत करण्यात आले आहेत. ही उत्तम कामगिरी चर्चगेट लोहमार्ग पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई (बक्कल नं. 3476) अशोक दातार यांनी केली. गहाळ झालेले दागिने परत मिळाल्याने महिलेने व तिच्या पतीने पोशि अशोक दातार व पोउनि बाळासाहेब पवार यांचे मनापासून आभार मानले.
28 डिसेंबर 2018 रोजी गिरगाव परिसरात राहणाऱ्या निलम सोलंकी (42) या पती मनीष सोलंकी यांच्यासोबत भाचीच्या लग्नाला भाईंदर येथे गेल्या होत्या. विवाहसोहळा आटपून दोघेही भाईंदर येथून लोकलने गिरगाव येथील राहत्या घरी जाण्यास निघाले. प्रवासादरम्यान त्यांनी दागिने असलेली बॅग रेल्वे डब्यातील रॅकवर ठेवली. रात्री 9:22 वाजता रेल्वे गाडी ग्रॅन्ट रोड स्थानकात आली. सोलंकी दाम्पत्य घडबडीत बॅग न घेता स्थानकात उतरले. बॅगेची आठवण झाली तोपर्यंत रेल्वे ग्रॅन्ट रोड स्थानकातून सुसाट निघून गेली होती. त्यांनी ताबडतोब चर्चगेट रेल्वे स्थानक गाठले. स्टेशन मास्टरला बॅगेची माहिती दिली. मात्र बॅग सापडली नाही.
दरम्यान सदर बॅग चर्चगेट लोहमार्ग पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई अशोक दातार यांना मिळाली. सदर बॅग चर्चगेट लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणली. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब पवार व पोलीस शिपाई असोक दातार यांनी सोलंकी दाम्पत्याचा शोध घेऊन 6 लाख 20 हजार रुपयांचे विविध दागिने त्यांना चर्चगेट लोहमार्ग पोलीस ठाण्यात परत केले.