मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई केली. नव वर्षांच्या स्वागतासाठी रंगणाऱ्या पार्ट्यांलाठी हैदराबादहून मुंबईत आणलेला 3 कोटी 4 लाख 5 हजार रुपयांचा इफिड्रीन हे अमलीपदार्थ जप्त करून 2 जणांना बेड्या ठोकल्या.
नव वर्षाच्या स्वागतासाठी रंगणाऱ्या पार्ट्यांसाठी येणाऱ्या अमलीपदार्थ, दारूसाठा यांवर नजर ठेवण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. त्या अनुषंगाने अंबोली पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोनि दया नायक हेदेखील नजर ठेवून असताना त्यांना खबऱ्याने अमलीपदार्थ येणार असल्याची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे अग्रवाल इस्टेट येथे पोलीस पथकाने सापळा लावला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तेथे 2 इसम येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 20 किलो 348 ग्रॅम इफिड्रीन हे अमलीपदार्थ व 15 हजार 740 रुपये आढळून आले. या अमलीपदार्थाची किंमत 3 कोटी 4 लाख 5 हजार रुपये असून, सदर अमलीपदार्थ 31 डिसेंबरच्या पार्ट्यांसाठी हैदराबादहून मुंबईत आणले होते.
अमलीपदार्थ तस्करी केल्या प्रकरणी मोहम्मद ईस्माईल गुलामहुसेन (45) व दयानंद माणिक मुद्दानर (32) यांना बेड्या ठोकण्यात आल्या.
हा गुन्हा परिमंडळ 9 चे उपायुक्त परमजीत सिंग दहिया, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड, खास पथकातील पोलीस निरीक्षक दया नायक, पोलीस उपनिरीक्षक सावंत, अंमलदार साटम, बोमटे, चव्हाण, पवार, साळवी, पाटील, पाडेकर आदी पोलीस पथकाने उजेडात आणला.