मुंबई : सतर्क तरुणांमुळे रेल्वे प्रवासात विसरलेली बॅग डोंबिवलीकर इसमाला परत मिळाली. त्या बॅगेत महत्त्वाचे कागदपत्र, एटीएम, कार्यालयाच्या व राहत्या घराच्या किल्ल्या होत्या. प्रवासात गहाळ झालेली बॅग परत मिळाल्याने डोंबिवलीकराने तरुणांचे व कुर्ला लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले. या प्रसंगावरून प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांनी रेल्वे प्रवाशांना केले.
दि. 31डिसेंबर 2018 रोजी डोंबिवलीकर अरविंद शहा हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली असा प्रवास बदलापूर लोकलने करत होते. सायंकाळी 7:30 वाजता शहा डोंबिवली स्थानकात उतरले. मात्र प्रवासादरम्यान रॅकवर ठेवलेली बॅग सोबत घ्यायला शहा विसरले.
दरम्यान, त्याच गाडीत दानिश शेख व शुफियान ही तरूण मुले चढले. त्यांना रॅकवरील बॅग निदर्शनास पडली. बॅग ताब्ृात घेऊन कुर्ला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केली. बॅगेतील महत्त्वाच्या कागदपत्रांच्या आधारे अरविंद शहा यांचा शोध घेण्यात आला. कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात शहा यांना बोलावून बॅग त्यांना परत करण्यात आली.