ठाणे : खून केल्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी अभिवचन रजेवर तुरुंगाबाहेर आला. रजेची मुदत संपल्यावर पुन्हा तुरुंगात जाण्याऐवजी फरार झाला. या आरोपीला तब्बल 5 वर्षांनंतर ठाणे गुन्हे शाखा घटक 1 च्या पथकाने गुजरात राज्यात गजाआड केले.
ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरात 2 ऑक्टोबर 2008 रोजी बबन शिंदे यांचा खून झाला. या खुनाप्रकरणी कळवा पोलिसांनी (गु. र. क्र. 215/2008) भादंवि कलम 302, 34 नुसार गुन्हा दाखल करून विश्वनाथ यादव ऊर्फ मोठा काका याला अटक केली. या खुनाप्रकरणी आरोप निश्चित झाल्यानंतर ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने 26 एप्रिल 2012 रोजी विश्वनाथ यादव याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कोल्हापूर कारागृहात शिक्षा भोगत असताना (बंदी क्र. सी – 5510) विश्वनाथ अभिवचन रजेवर तुरुंगाबाहेर आला. तुरुंगातून बाहेर पडताना त्याने नवी मुंबईतील यादव नगर, रबाळे येथील पत्ता कारागृहात नमूद केला. नियमानुसार रजा संपल्यानंतर 9 एप्रिल 2013 रोजी तुरुंगात हजर होण्याऐवजी विश्वनाथ यादव यांनी पळ काढला.
या प्रकरणी 26 नोव्हेंबर 2013 रोजी कोल्हापूर कारागृहाकडून तक्रार येताच रबाळे पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. 118/2013) भादंवि कलम 224 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. फरार विश्वनाथ यादवचा शोध सुरू असताना ठाणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखा घटक 1 च्या पथकाला विश्वनाथ यादवची माहिती मिळाली. यादव स्वत:ची ओळख लपवून गुजरात राज्यात राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांचे पथक तात्काळ गुजरात राज्यातील भावनगर येथे दाखल झाले आणि सापळा लावून 3 जानेवारी 2019 रोजी विश्वनाथ यादवला बेड्या ठोकल्या. पुढील कारवाईकरिता विश्वनाथ यादव याला रबाळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
फरार आरोपीला ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्ड्ये, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) दीपक देवराज, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) बाजीराव भोसले, गुन्हे शाखा घटक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि रणवीर बयेस, सपोनि संदीप बागुल, सपोनि अविराज कुराडे, सपोनि समीर अहिरराव, हवालदार अानंदा भिलारे, हवालदार संभाजी मोरे, हवालदार वसंत शेडगे, पोना अजय साबळे, पोना तौसिफखान पठाण, पोशि राहुल पवार, पोशि भगवान हिवरे या पथकाने बेड्या ठोकण्यात मोलाची कामगिरी बजावली.