ठाणे ( संतोष पडवळ) : ठाणे शहरातून जाणा-या महाराष्ट्र मेट्रोची मार्गिका आणि ठाणे अंतर्गत मेट्रोच्या मार्गिकेशी जोडणा-या वैयक्तिक जलद वाहतूक
यंत्रणा(पीआरटीएस) या प्रकल्पाचे आज युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समोर आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सादरीकरण केले. यावेळी श्री. आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पाविषयी समाधान व्यक्त करून सदर प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याच्यादृष्टीने काम करण्याच्या सूचना केल्या.
वैयक्तिक जलद वाहतूक यंत्रणा(पीआरटीएस) या प्रकल्पाविषयी श्री. आदित्य ठाकरे यांनी सहा महिन्यांपूर्वीच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा केली होती व ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्यादृष्टीने हा प्रकल्प कसा राबविता येईल याबाबत सूचित केले होते. त्यानंतर तज्ञ सल्लागारांच्या माध्यमातून या प्रकल्पाचा अहवाल तयार करून ना. एकनाथ शिंदे यांच्यासमोर त्याचे सादरीकरण करण्यात आले होते व त्यानंतर तो महासभेमोर सादर करण्यात आला होता.
ठाण्याच्यादृष्टीने अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प असून एकूण ५ टप्प्यात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पहिला आणि पाचवा टप्पा एकत्रितपणे राबविण्यात येणार असून एकूण १०३ किमी लांबीच्या या प्रकल्पाच्या पहिला व पाचवा टप्पा मिळून एकून ३४ किमी लांबीचा ट्रॅक बांधण्यात येणार असून त्यामध्ये एकूण ६० स्थानके उभारण्यात येणार आहेत.
यावेळी महाराष्ट्र मेट्रो, अंतर्गत मेट्रो तसेच पीआरटीएस या प्रकल्पाशी संबंधित सर्व सल्लागार, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.