मुंबई

आरोग्य विभागातील रिक्त पदे कालमर्यादेत भरून शेवटच्या घटकाला अपेक्षित सेवा द्या – पहिल्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ठाणे येथे टाटा कर्करोग रुग्णालयाचे केंद्र सुरू करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रयत्नशील

मुंबई, दि. 10 : आरोग्य विभागातील रिक्त पदे विहित कालमर्यादेत भरण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू आहे. टाटा कर्करोग रुग्णालयाचे केंद्र ठाणे येथे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून सर्वच जिल्हा रुग्णालयात मोफत केमोथेरपी सुविधा सुरू करावी. समाजातील शेवटच्या घटकाला अपेक्षित असलेली चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

आरोग्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच विभागाची आढावा बैठक मंत्रालयात घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या योजना याबाबत सविस्तर माहिती आरोग्यमंत्र्यांनी जाणून घेतली.

राज्यातील माता व बालमृत्यू रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतल्यानंतर आरोग्यमंत्री म्हणाले, या क्षेत्रात राज्याचे काम चांगले असून हा मृत्यूदर अजून कमी करण्यासाठी अजून प्रयत्न केले जावेत.

विभागातील रिक्त पदांबाबत आरोग्यमंत्री म्हणाले, सामान्य नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत. विविध संवर्गातील 15 हजार पदे रिक्त आहेत ती विहित कालमर्यादेत भरण्यात यावी. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना चांगल्या सेवा सुविधा दिल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून केमोथेरपी उपचाराची सुविधा जिल्हा रुग्णालयात मिळावी यासाठी सर्वच जिल्हा रुग्णालयात याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी होते,ती कमी करण्यासाठी ठाणे येथे टाटा कर्करोग रुग्णालयाचे केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी महापालिका जागा देण्यासही तयार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करून  सामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी विभागाने प्रयत्न करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

बैठकीस आरोग्य आयुक्त अनुपकुमार,राज्य एड्स सोसायटीचे तुकाराम मुंढे,महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेचे सुधाकर शिंदे यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सीटीस्कॅन आणि डायलिसिससाठी जिल्हानिहाय स्वतंत्र यंत्रणा

दरम्यान, बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री यांनी सांगितले की, ग्रामीण भागात असणारी प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र ही सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल. राज्यात मेगा भरती होणार असून त्या माध्यमातून आरोग्य विभागाची सुमारे दहा हजार रिक्त पदे भरण्यात येतील.

राज्यात शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सीटीस्कॅन आणि  डायलिसीससाठी मोठ्या प्रमाणावर रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. ही समस्या लक्षात घेता प्रत्येक जिल्हानिहाय सीटीस्कॅन आणि  डायलिसीससाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येणार असून त्यामुळे सामान्य रुग्णांना त्याचा लाभ होईल. ठाणे येथे महापालिकेने बांधलेल्या इमारतीमध्ये  सुमारे 100 डायलिसीस यंत्रांच्या मदतीने डायलिसीस सेंटर सुरु केले जाणार आहे. दुर्गम भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना वेतनाव्यतिरिक्त  सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्य कामगार विमा योजना सोसायटी अध्यक्षपद मुख्य सचिवांकडे राहणार असून केंद्र शासनाकडून मिळालेला 1600 कोटी रुपयांचा निधी कामगार विमा रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी वापरला जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!