महाराष्ट्र

पोलीस दलाने अधिकाधिक लोकाभिमुख होऊन लोकसेवेला प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे उद्घाटन; विविध विकास प्रकल्पांचे ई- भूमिपूजन

पुणे,दि.9:- पोलीस दल हे लोकसेवा करण्यासाठी असून त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक लोकाभिमुख होऊन लोकसेवेला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे ई- भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभात ते  बोलत होते.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे उद्घाटन आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. तसेच दीपप्रज्वलन करुन कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या वतीने मुख्यमंत्री यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर सादरीकरणाद्वारे पोलीस आयुक्तालय कामकाजाची पाहणी केली.

यानंतर झालेल्या मुख्य समारंभात पोलीस आयुक्तालय इमारतीचे उद्घाटन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी पहिला टप्पा, प्रधानमंत्री आवास योजना तसेच अर्बन स्ट्रीट डिझाईन अंतर्गत विकसीत रस्त्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून ई-भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर राहुल जाधव,खासदार सर्वश्री शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे,आमदार सर्वश्री लक्ष्मण जगताप,महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार,पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे,राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यावेळी उपस्थितीत होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करुन नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी सीसीटीव्ही तसेच इतर तांत्रिक बाबी देण्यावर भर देण्यात आलेला आहे. आयुक्तालयाचे काम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व अन्य सेवा सुविधा लवकरच देण्यात येतील. नागरी व ग्रामीण भाग समाविष्ट करुन आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वाढविण्यात आले आहे. पोलिसांच्या कामाचे मोजमाप करताना केवळ गुन्ह्यांच्या प्रमाणाचा विचार न करता किती गुन्हे उघडकीस आणले, किती लोकांना शिक्षा झाली, तसेच किती मुद्देमाल जप्त करण्यात आला, या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. अपराध सिद्धता प्रमाण नऊ टक्क्यांवरुन पन्नास टक्क्यापर्यंत वाढले, ही पोलीस विभागासाठी अभिमानाची बाब आहे.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध सेवा सामान्य लोकांपर्यंत गतिमानतेने पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. पिंपरी-चिंचवड ही श्रमिकांची नगरी असल्यामुळे येथील श्रमिकांसाठी मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री यांचे 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना महत्त्वपूर्ण ठरेल. अनधिकृत बांधकामांना समर्थन दिले जाणार नाही. परंतु शास्ती कराच्या बाबतीत सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्याबरोबरच मावळमधील आंदोलनग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येईल, त्यांच्या शेतीसाठी मायक्रो इरिगेशन करण्यात येईल,नुकसानग्रस्त कुटुंबाच्या पाठिशी सरकार संवेदनशीलतेने उभे राहून सदस्यांना नोकरीत सामावून घेईल,असे यावेळी ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. या नगरपालिकेने आजवर विविध लोकाभिमुख निर्णय घेऊन त्यादृष्टीने यशस्वी उपक्रम राबविल्याबद्दल महापालिकेच्या कामाचे श्री. फडणवीस यांनी कौतुक केले.

कायदा, सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य असते. सामान्यांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. बापट यांनी केले.

यावेळी महापौर राहुल जाधव,आमदार सर्वश्री महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांची समयोचित भाषणे झाली.

पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला तर एकनाथ पवार यांनी महानगरपालिकेच्या योजना व उपक्रमांची माहिती प्रास्ताविकातून दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. आभार अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी मानले. यावेळी लोकप्रतिनिधींसोबत पोलीस विभाग व महानगरपालिकेतील अधिकारी,कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिक उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!