ठाणे :- जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात येत असलेल्या दिवा, शिळ, देसाई व मुंब्रा – कळवा परिसरामध्ये विद्युतवितरण व्यवस्थेचे खाजगीकरण करण्यासाठी शासनाने टोरंट पॉवर कंपनीला काम देण्याचे ठरविले आहे. या विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक संख्या असून वीज ग्राहकांना कोणतीही सूचना न देता खाजगीकरणाचा घाट घालण्यात आल्याने वीज ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी मुंब्रा, दिवा, शिळ, देसाई विभागातील विद्युतीकरणाच्या खाजगीकरणाला तीव्र विरोध दर्शविला असून टोरंट पॉवर कंपनीला दिलेला लेटर ऑफ इंटरेस्ट तातडीने रद्द करण्याची मागणी ऊर्जामंत्र्यांकडे पत्राव्दारे केली आहे.
मुंब्रा विभागामध्ये अंदाजे ८४ हजार, दिवा – शिळ, देसाई विभागात ५६ हजार आणि कळवा विभागात सुमारे ६० हजार ग्राहक संख्या असून या विभागातील नागरिक खाजगीकरण होणार असल्याने संभ्रमात आहेत. तसेच अचानक खाजगीकरण होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. टोरंट पॉवर कंपनीचा भिवंडी येथील महावितरणच्या कामाचा अनुभव चांगला नसून भिवंडी परिसरामध्ये टोरंट पॉवर कंपनी विरोधात नागरिकांचा प्रचंड असंतोष आहे.
दिवा-शिळ, देसाई, मुंब्रा – कळवा विभागातील नागरिकांना महावितरणच्या खाजगीकरणा संबधी कोणतीही पूर्वसूचना अथवा विश्वसात न घेता केल्यास नागरिक कंपनी व प्रशासनाच्या पूर्णपणे विरोधात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मुंब्रा, दिवा, शिळ,देसाई विभागातील वीज ग्राहकांच्या भावना लक्षात घेता सदर खाजगीकरणाला तसेच टोरंट पॉवर कंपनीला दिलेला लेटर ऑफ इंटरेस्ट अन्याय कारक असून ताबडतोब रद्द करण्याची मागणी आमदार सुभाष भोईर यांनी ऊर्जामंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंब्रा, दिवा, शिळ, देसाई विद्युतीकरणाच्या खाजगीकरणाला आमदार सुभाष भोईर यांचा विरोध
