* आदित्य ठाकरेंचा भाजपवर नाव न घेता ‘निशाणा’
* सेल्फी पॉईंट, आंतरराष्ट्रीय जागतिक दर्जाच्या शूटिंग रेंज, अत्याधुनिक मासळी बाजार व महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी बहुउद्देशीय भवनाचे लोकार्पण
* युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते केले लोकार्पण

अंबरनाथ दि. ०९ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
काही पक्षांसाठी निवडणुका महत्त्वाच्या असतील, पण शिवसेनेसाठी लोकांची कामं महत्त्वाची आहेत, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आज भाजपवर नाव न घेता निशाणा साधला. अंबरनाथमध्ये झालेल्या शूटिंग रेंजच्या उद्घाटनावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. शूटिंग रेंजचं उद्घाटन केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनाही रायफल आणि पिस्टल हाती घेऊन निशाणा साधण्याचा मोह आवरला नाही. या कार्यक्रमासाठी शिवसेनेनं ‘आता निशाणा साधायचाच’ अशी बॅनरबाजी करत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत आदित्य ठाकरेंना विचारलं असता, काही पक्षांसाठी निवडणुका महत्त्वाच्या असतील, मात्र शिवसेनेसाठी नेहमीच लोकांची कामं, सुविधा महत्त्वाच्या आहेत, असं म्हणत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. पुढे ते म्हणाले की, आपण ज्याठिकानाहून भाज्या व मासे आपण विकत घेतो, हे रस्त्याच्या बाजूला व गटाराच्या बाजूला असते आणि बूटचे दुकान हे एसी मार्केटमध्ये असते. सगळीकडे साफसफाई असायला पाहिजे, स्वच्छ सर्वेक्षणात आपल्या नगरपरिषदेचा ६९ वा क्रमांक घेतलेला आहे. त्यामुळे आता ज्या ठिकाणी फिश मार्केट बनविलेले आहे, ती जागा आज आपण बघितली तर त्याठिकाणी पाण्याचा निचरा, ड्रेनेजची व्यवस्था, सर्व सोयीयुक्त फिश मार्केट बनविण्यात आलेलं आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी कौतुक केलेलं आहे.

शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते मंगळवारी शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले, यात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून अंबरनाथ पालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय जागतिक दर्जाच्या शूटिंग रेंजचे ही समावेश होता. युवानेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रथम अंबरनाथ पूर्वेकडील हुतात्मा चौकात नव्यानेच बनविण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट व पश्चिमेकडील उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या पाठपुराव्याने छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट मधील सुसज्ज अश्या मासळी बाजाराचे लोकार्पण करण्यात आले. येथील स्थानिक नगरसेवक व पालिकेचे उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख व व्यापारी मंडळींनी आदित्य ठाकरेंचा सत्कार केला. त्यानंतर भास्करनगर परिसराचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या प्रयत्नाने विभागात उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी बहुउद्देशीय भवन या वास्तूचे उदघाटन करण्यात आले. शेवटी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय जागतिक दर्जाच्या रायफल व पिस्टल शूटिंग रेंजचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले,

याप्रसंगी भारताच्या प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत, पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, दिपाली देशपांडे, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, उपनगराध्यक्ष अब्दूलभाई शेख, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, अंबरनाथचे मुख्याधिकारी देविदास पवार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र वाळेकर, नगरसेवक निखिल वाळेकर, किरणकुमार कंगणे, पंकज पाटील, नगरसेविका प्रज्ञा बनसोडे-धेंडे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी या वास्तू उभारणीकरीता ज्यांचे-ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानत अंबरनाथमधील पत्रकारांचे भरभरून कौतुक केले. तर माजी नगराध्यक्ष विजय पवार व नगरसेवक निखिल वाळेकर यांनी सूत्रसंचालन केले.