ठाणे (१२ जानेवारी ): गेल्या चार वर्षांत या शहरासाठी सतत काहीतरी करायचा प्रयत्न केला असला तरी अजूनही काही करायचे बाकी राहून गेले असल्याची कबुली स्वत: महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. महापालिका आयुक्त म्हणून ४ वर्षांचा मोठा टप्पा पूर्ण करताना त्यांनी नवीन वर्षांतील नवीन कामांची आखणी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या अधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते.
गेल्या चार वर्षांत आपण लोकहिताच्या, शहराच्या विकासाच्या विविध योजना हाती घेतल्या. त्यातील काही योजना प्रगतीपथावर आहेत. काही सुरू झाल्या पण त्या संथ गतीने सुरू आहेत. काही योजना काही कारणांमुळे अद्यापही सुरू झाल्या नसतील त्या योजना प्रामाणिकपणे या वर्षांत सुरू करता येतील का किंवा करताच येणार नसेल तर तसे मान्य करून त्याऐवजी नवीन काही योजना राबविता येतील का याचा विचार करता येईल असे श्री. जयस्वाल यांनी प्रांजळपणे कबूल केले.
या शहरासाठी मी जे काही करायचा प्रयत्न केला ते प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी यापुढेही त्याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे समाजाच्याप्रति काम करण्याचे आवाहन त्यांनी सर्व अधिका-यांना करतानाच काही करायचेही राहून गेले असल्याची कबुली श्री. जयस्वाल यांनी या बैठकीत दिली. तसेच हे करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी, नागरिकांनी साथ दिली त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
आपली निष्ठा नागरिकांच्याप्रति असल्याचे मान्य करीत यापुढे सामाजिक आणि लोकहिताच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देवून ते विषय फेब्रुवारीच्या महासभेत मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.