मुंबई : बेस्ट संपाच्या पेचातून मार्ग काढण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीतही शनिवारी तोडगा निघाला नाही. बेस्ट प्रशासनाने मागण्या मान्य करण्याबाबत लेखी आश्वासन देण्यास नकार दिल्याने संप मागे घेण्यास कृती समितीच्या नेत्यांनी नकार दिला. त्यामुळे मुंबईकरांचे हाल आज सहाव्या दिवशीही कायम राहणार आहेत.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन संपाच्या पहिल्या दिवसापासून देण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीतही त्यावर होकार दर्शवण्यात आला. पण बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी लेखी आश्वासन दिले नाही. पालिका आयुक्त अजय मेहता यांनीही बेस्ट उपक्रमासाठी आर्थिक मदत करण्यास नकार दिल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशीषकुमार सिंह, आयुक्त मेहता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, सुरेंद्र कुमार बागडे यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता होती. पण लेखी आश्वासनाच्या मागणीवर कामगार नेते शशांक राव ठाम राहिले.