मुंबई

लाल बादशहा ९ दिवसानंतर रस्त्यावर

मुंबई:  ‘बेस्ट’च्या इतिहासात सर्वाधिक म्हणजेच, तब्बल ९ दिवस चाललेला संप अखेर मिटला आहे. संपकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्याची तयारी प्रशासनानं मुंबई उच्च न्यायालयात दाखवल्यानंतर ही कोंडी फुटली. बेस्ट कर्मचारी कृती समितीचे नेते शशांक राव यांनी वडाळा येथे झालेल्या कामगार मेळाव्यात संप मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळं काही वेळातच बेस्ट बस रस्त्यावर धावणार असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उच्च न्यायालयात आज निर्णायक सुनावणी झाली. संप मागे घेतल्यास लवादासमोर सर्व मुद्द्यांवर चर्चा करता येईल, अशी भूमिका प्रशासनानं न्यायालयात मांडली. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारनंही चर्चा होण्यापूर्वी संप तत्काळ मागे घेतला जावा, असा मुद्दा मांडला. त्यानंतर कृती समितीनं संप तासाभरात मागे घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. त्यानुसार काही वेळापूर्वीच संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. वेतनवाढीची मागणी मान्य झाल्यामुळं कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान ७ हजारांची वाढ होईल, अशी माहिती शशांक राव यांनी यावेळी दिली. त्यावेळी उपस्थित कामगारांनी एकच जल्लोष केला.

बेस्टला संपवण्याचा डाव उधळला: शशांक राव

बेस्ट कर्मचारी कृती समितीचे नेते शशांक राव यांनी संपाच्या यशाचं श्रेय सर्व कामगारांना देतानाच संपाला सहकार्य करणाऱ्या मुंबईकरांना सलाम केला. त्याचवेळी, संप फोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांवर नाव न घेता जोरदार टीका केली. संप यशस्वी झाल्यामुळं काहींना मिरच्या झोंबल्या आहेत. दिशाभूल करणारे मेसेज पाठवले जात आहेत. कामगारांनी त्यांना भुलू नये. ‘जे काही झालंय ते उच्च न्यायालयात लिहून घेण्यात आलं आहे. ते झालं नाही तर उच्च न्यायालय काय ते बघून घेईल, असं राव म्हणाले.

‘या संपाचा फायदा उठवून बेस्ट कर्मचाऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न झाला. आमच्यासमोर ऑफर म्हणून बेस्ट कामगारांचं मृत्यूपत्रच ठेवण्यात आलं होतं. पण हे मृत्यूपत्र आम्ही नाकारलं,’ असं राव म्हणाले. बेस्टला किती मदत करायची, असा प्रश्न काही लोक विचारत होते. पण आता तुम्हाला किती मदत करायची हे बेस्ट कामगार ठरवतील, असा सूचक इशारा राव यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!