उत्तर प्रदेश राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ लोकमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती
मुंबई, दि. 24:- आपण सर्वांनी एकत्र येऊन सातत्यपूर्ण प्रयत्नातून देशाला महासत्ता बनवू या, असे आवाहन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी आज येथे केले. उत्तर प्रदेश राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘एक भारत श्रेष्ठ भारत’लोकमहोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार आशिष शेलार, संयोजक अमरजित मिश्रा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात सांस्कृतिक, सामाजिक,शैक्षणिक, कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यपाल श्री. नाईक म्हणाले,अमेरिकेत ज्याप्रमाणे भारतीय अभियंत्यांना महत्त्व आहे, त्याचप्रमाणे मुंबईत येऊन उत्तर प्रदेशवासियांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. त्यांनी आता यापुढे जाऊन आपली मातृभूमी असलेल्या उत्तर प्रदेशच्या समृद्धतेत भर घालण्यासाठी योगदान द्यावे.
उत्तर प्रदेश सर्वोत्तम प्रदेश होण्याच्या मार्गावर आहे. उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनविण्याचे कार्य सुरु आहे. गेल्या साडेचार वर्षात अनेक विकास प्रकल्प वेगाने राबविले जात आहेत. गेल्या पंधरा दिवसांत उत्तर प्रदेशात गीत रामायणाचे कार्यक्रम आयोजित केले. त्यांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आहे. अशा प्रकारे रामायण ऐकण्याची आगळी अनुभूती उत्तर प्रदेशवासीय घेत आहेत. मातृभूमिविषयीची कृतज्ञता ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे त्यासाठी आपले योगदान देण्यासाठी पुढे यावे लागेल. आपण भारतीय म्हणून सातत्यपूर्ण असे प्रयत्न करत राहिलो, तर देशाला महासत्ता बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला एकात्म असे प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.
राज्यपाल श्री. नाईक यांनी प्रयागराज कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत माहिती देतानाच, त्यासाठी उपस्थितांना निमंत्रण दिले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनीही उत्तर प्रदेश स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते खूप जुने आहे. उत्तर प्रदेशची भूमी वंदनीय अशीच आहे. ती श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची भूमी आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि तिचा विस्तार देशभर झाला. मराठे जसे देशभर विखुरले आहेत, तसेच उत्तर भारतीय देशाच्या काना-कोपऱ्यात पोहोचले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकातही उत्तर प्रदेशातून आलेल्या गागाभट्टांनी मोठी भूमिका बजावली होती. उत्तर प्रदेशचे नागरिकही आता महाराष्ट्राच्या संस्कृतीत दुधात साखर विरघळावी तसेच मिसळून गेले आहेत. त्यांच्या तीन-तीन पिढ्या इथल्याच आहेत. त्यामुळे ते आता मुंबईकर होऊन गेले आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या संस्कृतीतील मधुरता अनेकांपर्यंत पोहोचविता येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार हे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अभियान आयोजित केले जाते आहे. ते एकात्मकता आणि भारतीयत्वाची भावना वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
नुकताच वाराणसीच्या दौऱ्यात राज्यपाल श्री. नाईक यांच्या पुढाकारातून कविश्रेष्ठ ग.दि. माडगुळकर आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गीत रामायणाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे अनुभवता आल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ म्हणाले, मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईच्या वाढीत उत्तर प्रदेशवासियांनीही मोठे योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यासाठीचे प्रयत्न आणि पानिपतच्या लढाईतील मराठ्यांचे शौर्य अलौकिक असे होते. महाराष्ट्राची भूमी संत, थोर राष्ट्रपुरूषांची भूमी म्हणून ओळखली जाते. आपला देश सामाजिक समतांचा पुरस्कर्ता आहे. यात महाराष्ट्रातील दूरदृष्टीच्या धुरिणांचे मोठे योगदान आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नागपूरमधील दीक्षाभूमीचा विकास आणि मुंबईतील यथोचित स्मारक उभारण्याचे महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न गौरवास्पद असे आहेत. महाराष्ट्र शासन लोकाभिमुखता आणि विकास पथावरील अग्रेसर असे राज्य म्हणून राहण्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वाचे मोठे योगदान असल्याचेही श्री. योगी यांनी नमूद केले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. योगी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठीचे, पानिपत लढाईतील मराठ्यांचे अलौकिक शोर्य तसेच लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्यांचा गौरवाने उल्लेख केला. त्यांनीही प्रयागराज कुंभमेळ्यास येण्याचे निमंत्रण दिले.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. संयोजक अमरजित मिश्रा यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाचे संयोजन केले. आमदार श्री. शेलार यांचेही भाषण झाले. अभिनेता रवि किसन, पद्मश्री मालिनी अवस्थी आदी कलाकारांनी विविध कार्यक्रम सादर केले.