ठाणे

वर्तमानपत्र म्हणजे “मानवी समाजाचा आरसा’’…एपीएसआयटी’ कॉलेजमध्ये मिलिंद बल्लाळ यांचे प्रतिपादन

ठाणे : ऑनलाईन माध्यमांच्या सहाय्याने सर्व क्षेत्रांशी निगडित घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचत असल्या तरी अचूक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी वर्तमानपत्रांना पर्याय नाही, असा सूर पहायला मिळाला तो ‘वर्तमानपत्र वाचनाचे महत्त्व’ या विषयावर आधारित एका खास कार्यक्रमामध्ये. ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन आणि ठाण्यातील ए.पी. शहा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे सुरेश पुजारी आणि राकेश पांडे, लोकसत्ताचे व्यवस्थापक संदीप तेलंगे, ठाणेवैभव चे मुख्य संपादक मिलिंद बल्लाळ, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थी-वाचक आणि वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी यांच्यात थेट संवाद घडावा, वर्तमानपत्र तयार करण्याचे टप्पे विद्यार्थ्यांना कळावेत आणि विद्यार्थ्यांमध्ये वर्तमानपत्र नियमितपणे वाचण्याविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोणतेही वर्तमानपत्र संपूर्णपणे वाचायचे झाल्यास साधारणपणे अर्ध्या तासाचा कालावधी लागतो; मात्र एका आकडेवारीनुसार भारतीय नागरिक सरासरी केवळ एका मिनीटापेक्षाही कमी वेळ वर्तमानपत्र वाचतात, हे धक्कादायक वास्तव मिलिंद बल्लाळ यांनी उपस्थितांसमोर मांडले.ऑनलाईन माध्यमांतून तुम्हाला दैनंदिन घटनांची माहिती मिळेल;पण वर्तमानपत्रांचे वाचन तुम्हाला वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ बनवेल, असे मत त्यांनी नोंदवले. वर्तमानपत्रांशी असलेला जिव्हाळा हा पिढ्यानपिढ्या कमी होत चालला असला तरी बातमीची सत्यता केंद्रभागी ठेऊन काम करणाऱ्या वर्तमानपत्रांना सध्यातरी दुसरा एखादा सशक्त पर्याय नाही, असे निरीक्षण राकेश पांडे यांनी नोंदवले. कोणत्याही इतर माध्यमांपेक्षा छापील स्वरूपात वाचलेला मजकूर आपल्या जास्त काळ स्मरणात राहतो. त्यामुळे शिक्षणानंतर मुलाखतीला सामोरं जाताना वर्तमानपत्र वाचनातून मिळालेले ज्ञान नक्की उपयोगी पडू शकते, असे प्रतिपादन लोकसत्ताचे संदीप तेलंगे यांनी केले. शिक्षणानंतर नोकरीतील विविध आव्हानांना सामोरे जाताना वर्तमानपत्राचे वाचन एखाद्या दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करू शकते, असे मनोगत टाइम्स ऑफ इंडियाचे सुरेश पुजारी यांनी व्यक्त केले. वर्तमानपत्रांच्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये वृत्तपत्र वितारकांचे अत्यंत महत्वाचे योगदान राहिले आहे . त्यामुळे सर्व उपस्थितांनी उभे राहून टाळ्या वाजवत दररोज सकाळी वर्तमानपत्र आपल्या घरी पोहोचवणाऱ्या वृत्तपत्र वितरकांना मानवंदना दिली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!