मुंबई, दि.29 : देशातील कामगार चळवळीचे प्रणेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने एका वादळी पर्वाचा अस्त झाला असून आपण स्वातंत्र्योत्तर काळातील एक महत्त्वाचे राजकीय व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, जॉर्ज फर्नांडिस भारतीय राजकारणातील एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. देशातील कामगार चळवळीला त्यांनी संघर्षाचा एक धगधगता आयाम दिला. त्यात त्यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तरच्या दशकात झालेला रेल्वे कर्मचाऱ्यांचा अभूतपूर्व संप एक महत्त्वाचा अध्याय आहे. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक राजधानीतील संघटित कामगार हे त्यांच्या लढाऊ संघटन कौशल्याचे फलित आहे. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून जबाबदारी बजावताना त्यांनी अणुचाचण्या घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात विविध महत्त्वाच्या विभागांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. कोकण रेल्वेच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते.
जॉर्ज फर्नांडिस कष्टकरी वर्गाचे धुरंधर नेते : राज्यपाल
मुंबई, दि. 29 : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी माजी केंद्रीय संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
जॉर्ज फर्नांडिस हे स्वातंत्र्योत्तर काळातील कामगार आणि कष्टकरी वर्गाचे धुरंधर नेते होते. कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक यशस्वी आंदोलने केली. अभूतपूर्व लोकप्रियता लाभलेले जॉर्ज फर्नांडिस यांनी केंद्रातील विविध सरकारांमध्ये जबाबदारीची पदे भूषविली होती.
दिवंगत प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जॉर्ज फर्नांडिस मंत्री असताना त्यांच्यासमवेत काम करण्याची मला संधी लाभली. माझ्या विनंतीवरून त्यांनी तेलंगण राज्यातील करीमनगर येथे परमवीर चक्र विजेते शहीद कॅप्टन विजय रघुनंदन राव यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. करीमनगर येथील ख्रिश्चन मिशनरी हॉस्पिटल येथे ‘अंतिम संस्कार’मृतवाहिकेचे लोकार्पण देखील फर्नांडिस यांनी केले होते. त्यांच्या निधनाने देशाने एक थोर संसदपटू व सच्चा कामगार नेता गमावला आहे,असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने कामगार चळवळीचा-कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज हरवला – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. २९ : माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने कष्टकऱ्यांचा आणि कामगार चळवळीचा बुलंद आवाज हरवला आहे. आज आपला देश एका सच्च्या आणि तळमळीच्या नेत्याला आणि कार्यकर्त्याला मुकला, अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
पत्रकार, राजकीय कार्यकर्ता, कामगार नेता, विविध विभागांचे मंत्री अशा विविध नात्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडताना श्री. फर्नांडिस यांनी रेल्वेच्या माध्यमातून भारताला जोडण्याचे तर संरक्षण खात्याचे मंत्री म्हणून देशाला भक्कम करण्याचे काम केले. भाषा प्रभुत्व हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. रोखठोक स्वभाव, निर्णयातील सुस्पष्टता आणि सडेतोडपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग. नऊ वेळा लोकसभेचे खासदार राहिलेले श्री. फर्नांडिस यांनी कामगारांचे नेतृत्व करताना त्यांच्या हिताची बाजू अतिशय बेधडकपणे मांडली. देशातील गोरगरिबांचा आवाजम्हणूनही ते परिचित होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो असेही श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
नवसंकल्पनांचा तीव्र आवाज विसावला – विनोद तावडे
मुंबई, दि. २९ : प्रतिभावंत नेते आणि देशाचे संरक्षणमंत्री राहिलेले जॉर्ज फर्नांडिस हे एक दृढनिश्चयी नेते होते. त्यांच्या निधनाने आपण नवसंकल्पनांचा तीव्र आवाज गमावला या शब्दात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
जॉर्ज फर्नांडिस यांनी सामान्यांना सदैव समर्थन दिले. शोषितांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या सबलीकरणासाठी ते सदैव प्रयत्नशील होते. त्यांच्या मनमोकळ्या आणि निडर दूरदृष्टीने देशाच्या प्रगतीमध्ये मौल्यवान योगदान दिले. त्यांच्या निधनाने आपल्या देशाचे प्रचंड नुकसान झाले असून संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.