डोंबिवली : ( शंकर जाधव ) पूर्णवाद परिवार सेवा मंडळ आणि पूर्णवाद लाईफ मँनेजमेंट इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा डॉ. पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, प्रसिद्ध वक्ते तथा लेखक चन्द्रशेखर टिळक यांना जाहीर झाला आहे. आर्थिक क्षेत्रातील प्रभावी, समाजपयोगी आणि सातत्यपूर्ण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. हे पुरस्काराचे दहावे वर्ष आहे. अच्युत गोडबोले, डॉ. अजित रानडे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, डॉ. विनायक गोविलकर, डॉ. दीपक मोहन्ति, डॉ. सुलभा ब्रम्ही यांच्यासारखे मान्यवर आधीच्या वर्षातले या पुरस्काराचे मानकरी आहेत. चन्द्रशेखर टिळक हे एनएसडीएलमधे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांची आजपर्यंत १६ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाचा प्रभावी भाष्यकार म्हणून त्यांचे नाव साऱ्या देशभर गाजत असते. अर्थकारण व गुंतवणूक या विषयांशी संबंधित सुमारे ३००० भाषणे त्यांची झाली असून सुमारे २००० लेख प्रसिद्ध झाले आहेत. शनिवार २ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता सीकेपी हॉल, खारकर आळी, ठाणे (पश्चिम) येथे यावर्षीचा डॉ. पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार चन्द्रशेखर टिळक यांना प्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभूदेसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चन्द्रशेखर टिळक यांना यंदाचा डॉ. पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार जाहीर
January 30, 2019
64 Views
1 Min Read

-
Share This!