डोंबिवली : ( शंकर जाधव ) देशाच्या सत्तेत ज्यांना कधीही वाटा मिळाला नाही त्यांना संविधानामुळेच कायदेशीर वाटा मिळाला. संविधानावर देश चालतो. संविधानाचा उच्चार सातत्याने व्हायला पाहिजे. कायदा झाला म्हणून बदल होत नाही. प्रत्येक संस्थानी आणि संघटनेने संविधान दिन साजरा केला पाहिजे.संविधानाच्या विचारावरच हा देश चालेल. संविधानाने समाज चालविण्याची बांधिलकी जपली गेली पाहिजे असे वक्तव्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन संघटनेच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर यांनी केले.
अनुभूती संस्थेच्या माध्यमातून विधान साक्षरता आंतर-महाविद्यालयीन स्पर्धापरीक्षेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मुक्ता दाभोलकर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अनुभूती संस्थेच्या अध्यक्षा दीपा पवार, आरती कडे, ट्रांस जेन्डरच्या दिशा पिंकीशेख आदी मान्यवर उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन संस्था ३० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सुरु झाली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ही संस्था सुरु केली. महाराष्ट्रातून सुमारे ३०० शाखेतून कार्य सुरु आहे. समविचारी संघटनाशी जोडून घेणे हा संस्थेचा उद्देश आहे. त्यांनी सांगितले कि, संविधानमध्ये कितीही आदर्श शब्द, उत्कृष्ट मुल्ये मांडली असली तरी संविधान राबविणारी माणसच जर का सामान्य असतील, चांगली माणंस नसतील तर संविधान काहीही करू शकणार नाही. आणि ही जी मूल्य मानणारी माणंस असतील तर त्यांना चांगल संविधान नसलं तरीही ती समाजामध्ये चांगली व्यवस्था उभारता येईल. नुसतं संविधानाला वेटाळून बसता कामा नये तर वापर करू इच्छीणारी माणंस पाहिजेत. संविधानाने समजासाठी साध्य निर्माण केले आहे. संविधानाची प्रेरणा घेऊन जगणाऱ्या माणसांना एक ताकद मिळत आहे. पण यासाठी सामाजिक चळवळीशी नाळ जोडणे फायदाचे होते. संविधानाच्या ताकदीचा अनुभव घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. समाजाची अशी समजूत असते कि आपल्या ज्या परंपरा आहेत तोच कायदा आहे. व्यक्ती स्वातंत्र्य हा भारतीय राज्य घटनेचा मुलभूत आधार आहे. समाजातील विचित्र आव्हानांना तोंड देतांना संविधानाचा आधार घ्यायचा आहे. संविधानाला मान्यता आहे अशी माणसांची मने जोडायची आहेत. तर ट्रांस जेन्डरच्या दिशा पिंकीशेख म्हणाल्या, सामाजिक जीवनात महिलांचे प्रश्न संविधानामुळे सुटतात. पूर्वी मुल आणि चूल यामध्येच महिलांचे जीवन व्यथित होत होते. पिढीजात गुलामगिरीच्या परंपरेने जगणारी माणसे आता माणूस म्हणून जगू शकत आहे ते संविधानामुळेच आणि आज संविधानामुळेच लोकतंत्र टिकून आहे. पुढे स्पर्धा परिक्षेत उच्चतम गुण प्राप्त करणाऱ्या प्रथम ३ विद्यार्थ्यांना क्रमाने प्रथम पारितोषक ८००० रुपये, द्वितीय पारितोषक ५००० रुपये व तृतीय पारितोषक ३००० रुपये देऊन प्रसिद्ध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.