डोंबिवली : ( शंकर जाधव ) वांद्रे येथे परप्रांतीय रिक्षाचालकाने मराठी मुलाला मारहाण केल्याची घटनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा परप्रांतीयांना मनसे स्टाईलने वटणीवर आणण्याचे ठरवले आहे.डोंबिवलीत परप्रांतीय रिक्षाचालकांची संख्या वाढत असताना त्यापैकी अनेकजणांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे उघड झाले आहे. आता अश्या परवाना न काढता रिक्षा चालविणाऱ्यांच्या रिक्षात डोंबिवलीकरांनी बसू नका अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी केली आहे.शनिवारी पूर्वेकडील स्टेशनसमोर उभ्या असलेल्या रिक्षाचालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे परवाना आणि कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. हा रिक्षाचालक परप्रांतीय असून त्याला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून वाहतूक पोलीस शाखेच्या ताब्यात दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, मनविसे शहरसचिव कौस्तुभ फडके, शाखाअध्यक्ष स्वप्नील वाणी यांनी शनिवारी डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनसमोरील काही रिक्षाचालकांची चौकशी केली. त्यावेळी रामब्रीज भारद्वाज हा रिक्षाचालक कोणतेही कागदपत्र आणि परवाना नसताना एमएच०५-सी४-९६८८ ही रिक्षा चालवीत असल्याचे दिसले. आजमगढ येथून आलेल्या हा परप्रांतीय तरुण अश्या प्रकारे कागदपत्र आणि परवाना नसताना रिक्षा चालविण्याचे धाडस करत असल्याने शहरात अश्या प्रकारे अनेक रिक्षाचालक आहेत.अश्या रिक्षाचालकांच्या रिक्षात डोंबिवलीकरांनी प्रवास करू नका अशी विनंती कदम यांनी केली आहे. याबाबत डोंबिवली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक एस.एन.जाधव यांना विचारले असता, या रिक्षाचालकावर नियमाप्रमाणे हजार रुपये दंड आकारून कारवाई करण्यात आली आहे.आवश्यक कागदपत्रे वाहतूक शाखेत दाखविल्यास त्याची रिक्षा सोडली जाईल. तोपर्यत त्याची रिक्षा जप्त केली आहे
वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कडक कारवाईची मागणी…
डोंबिवलीत सुमारे ८ ते १० हजार रिक्षा धावतात.यातील अनेक रिक्षाचालक आवश्यक कागदपत्रे आणि परवाना न काढताच रिक्षा चालवितात.त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांची संयुक्त कारवाई फार कमी होत असल्याचा फायदा असे रिक्षाचालक घेत असल्याची वास्तविकता समोर आली आहे. अश्या रिक्षाचालकांना वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कारवाईचे भय राहिले नाही अशी चर्चा सुरु झाली आहे. वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कडक कारवाई करावी अशी मागणी मनसेकडून केली जात आहे.