अंबरनाथ दि. ०४ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
अंबरनाथमध्ये गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले जाईल आणि दूषित पाणी अधिकाऱ्यांना पाजण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. अंबरनाथमधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, आमदार डॉ. बालाजी किणीकर , नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, विजय पवार, पाणी पुरवठा सभापती संदीप भराडे, नगरसेवक निखिल वाळेकर यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.
शहरात ३६ तास पाणीकपात असताना देखील पाणी पुरवठा सुरळीत व्हायला अधिक कालावधी लागतो, नागरिकांनी पाण्याचा साठा किती करायचा असा सवाल शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी मजीप्राचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर.आर. शिंदे यांना विचारून त्यांना धारेवर धरले. कोणतीही पूर्वसूचना न देता दूषित पाणी अधिकाऱ्यांच्या तोंडात ओतण्याचा इशाराही वाळेकर यांनी दिला. पाणी गळती आणि वितरण व्यवस्था सुधारल्यास पाणी टंचाई जाणवणार नाही पण अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाने पाणी समस्या जाणवते, असेही वाळेकर म्हणाले.
यासंदर्भात मजीप्राचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर.आर. शिंदे यांनी सांगितले की, पाणी पुरवठ्या संदर्भातील समस्या त्वरित दूर करण्यात येतील आणि शुद्ध पाणी पूरवठा करण्याला प्राधान्य देण्यात येईल कमी पावसामुळे पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाणीकपात करावी लागते. मात्र त्यातील तफावत कमी करण्यात येईल असे कार्यकारी अभियंता शिंदे यांनी मोर्चेकऱ्यांना सांगितले आणि तसे लेखी निवेदन दिले. यावेळी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, सोबत आणलेली मडकी कार्यालयासमोर फोडून महिलांनी संताप व्यक्त केला.