ठाणे (संतोष पडवळ ): ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील नूतनीकृत खेळपट्टीवर घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र सेलिब्रेटी क्रिकेट’ लीगच्या पहिल्या पर्वात खतरनाक मूळशी संघाने पराक्रमी पुणे संघावर रोमहर्षक विजय मिळवत सिनेनाट्य कलाकारांच्या पहिल्या ‘महाराष्ट्र सेलेब्रेटी क्रिकेट लीगच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. विजेत्या संघाला खासदार डॉ .श्रीकांत शिंदे व सिध्दिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या शुभहस्ते पारितोषिक देवून गौरवण्यात आले.दरम्यान या निमित्ताने घेण्यात आलेल्या प्रदर्शनीय सामन्यात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नाबाद 40 धावांची धडाकेबाज खेळी करत आपल्या ‘अस्सल ठाणेकर’ संघाला विजय मिळवून देत ‘मॅन ऑफ द मॅच’हा किताब पटकावला.
महाराष्ट्र सेलिब्रेटी क्रिकेट लीगमध्ये घेण्यात आलेल्या प्रदर्शनीय सामन्यात कलाकारासोबत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या नेत्तृत्वाखालील ‘अस्सल ठाणेकर’ या संघाने बाणेदार ठाणे या कलाकारांच्या संघावर विजय मिळविला. ठाण्याच्या विकासात जवळपास 200 हून अधिक नाबाद विकास प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवणारे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी क्रिकेटच्या मैदानातही नाबाद खेळी करत आपलं कर्तुत्व सिध्द केले आहे.अस्सल ठाणेकर या संघात महापालिका आयुक्त श्री .जयस्वाल यांच्या नेत्तृत्वाखालील खासदार डॉ .श्रीकांत शिंदे, मनसे ठाणे शहर अध्यक्ष अभिजीत पानसे,शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, नगरसेवक नजिम मुल्ला, भूषण भोईर, पूर्वेश सरनाईक, यांच्यासह महापालिका अधिकारी देखील या संघात सहभागी होते.अस्सल ठाणेकर संघाने प्रथम फलंदाजी करून 10 षटकात 101 धावा केल्या. बाणेदार ठाणे संघाला अस्सल ठाणेकर संघाचे 102 धावाचे आवाहन 10 षटकात पूर्ण करता आले नाही.अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्याचा क्रीडा रसिकांनी मनमुराद आनंद घेतला.
पारितोषिक वितरण समारंभास ज्येष्ठ अभिनेते उदय सबनिस, जयंत वाडेकर, विजय पाटकर, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे,उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले पुणे महापालिकेचे नगरसेवक श्री. दगडे पाटील, अभिनेते महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, उपेँद्र लिमये, दिग्दर्शक विजू माने, अभिनेता मंगेश देसाई, आकाश पेंढारकर, संदीप जुवाटकर, अभिजीत भोसले आदी उपस्थित होते .