महाराष्ट्र

रस्ते सुरक्षेबाबत लोकप्रबोधनासाठी प्रसिद्धी माध्यमांची भूमिका महत्त्वाची – परिवहन आयुक्त शेखर चन्ने

परिवहन आयुक्तालय, मुंबई प्रेस क्लब, राधी फाउंडेशन यांच्यामार्फत पत्रकारांसाठी ‘रस्ते सुरक्षा आणि अपघातांचे वार्तांकन’या विषयावर कार्यशाळा

मुंबई, दि. ५ : राज्यात मागील वर्षी रस्ते अपघातात सुमारे १३ हजार मृत्यू झाले आहेत. आधीच्या वर्षीच्या तुलनेत हे मृत्यू ४ टक्क्यांनी अधिक आहे. शिवाय यातील बहुतांश मृत्यू हे वाहतुकीचे नियम न पाळल्याने मानवी चुकांमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षेबाबत लोकप्रबोधन अत्यावश्यक असून याकामी प्रसिद्धी माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. माध्यमांनी रस्ते सुरक्षेबाबत लोकशिक्षणाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी आज येथे केले.

परिवहन आयुक्तालय, मुंबई प्रेस क्लब, राधी फाउंडेशन यांच्यामार्फत आज येथे पत्रकारांसाठी ‘रस्ते सुरक्षा आणि अपघातांचे वार्तांकन’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी, पोलीस अधीक्षक (महामार्ग पोलीस) विजय पाटील, सह परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, राधी फाउंडेशनच्या संस्थापक संचालक डॉ. रिटा सावला, संचालक आसीफ रेशमवाला, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष धर्मेंद्र जोरे, सचिव लता मिश्रा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. प्रकाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

विकसनशील देशांमधील अपघाती मृत्यूंचे प्रमाण २०२० पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आपल्या राज्यानेही तेच उद्दिष्ट ठेवले आहे. या कामात रस्ते आणि वाहनांमधील अभियांत्रिकी सुधारणा,अंमलबजावणी याबरोबर लोकशिक्षण महत्त्वाचे आहे. रस्ते वाहतूक करताना घ्यावयाची काळजी,हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर, दारु पिऊन तसेच मोबाईलवर बोलताना वाहन न चालविणे आदींबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. या कामी प्रसारमाध्यमांनी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी सहपरिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले.

अपघातांच्या बातम्या लिहिताना त्यात अपघाताच्या कारणांचा उल्लेख केल्यास ते रस्ते सुरक्षेबाबत जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल,असे यावेळी पोलीस अधीक्षक (महामार्ग पोलीस) विजय पाटील म्हणाले. एखादा अपघाती मृत्यू हेल्मेटच्या वापराअभावी किंवा वाहतुकीचे नियम न पाळल्याने झाल्यास बातमीमध्ये त्याचा आवर्जून उल्लेख केल्यास इतर लोकांना त्यातून बोध मिळू शकेल, असे ते म्हणाले.

राधी फाउंडेशनच्या संस्थापक संचालक डॉ. रिटा सावला म्हणाल्या की, रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूमुळे जितके नुकसान होते, त्यापेक्षा जास्त नुकसान रस्ते अपघातात लोक जखमी झाल्यामुळे होते. अनेक लोक कायमचे जायबंदी होतात. देशाच्या सक्षम मनुष्यबळाचे हे फार मोठे नुकसान असून रस्ते अपघातांमुळे देशाच्या जीडीपीचेही मोठे नुकसान होते, असे त्यांनी नमूद केले.

कार्यशाळेत मुंबईतील विविध वृत्तपत्रे,वृत्तवाहिन्या आणि रेडिओ वाहिन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!