डोंबिवली : ( शंकर जाधव ) वंचित आघाडीच्या मतांचा फायदा आमच्या सेना-भाजपा आधाडीला होणार. प्रकाश आंबेडकर वंचित आधाडीचे नेते आहेत. आपल्या पक्षाबाबत काय भूमिका घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे. परंतु वंचित आघाडी वंचिताना सत्तेपासून वंचित ठेवणार आहे. त्या वंचिताना माझे आवाहन आहे कि, सत्तेसाठी तुम्ही एकत्र आलात असाल तर तुम्ही माझ्यासोबत आले पाहिजे. प्रकाश आंबेडकरसोबत जावून तुम्हाला सत्ता मिळणार नाही. वंचित समाजाचे लोक आमच्यासोबतच आहेत. काही नारज लोक तिकडे गेलेले असले तरी महाआघाडीसोबत वंचित समाजाचे लोक सहभागी आहेत. यामुळे वंचित आघाडीला यश मिळणार नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी डोंबिवली येथे व्यक्त केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आठवले डोंबिवलीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, समाजवादी फाॅवर्ड ब्लॉकचे महामंत्री सतीशराज शिर्के, रिपाई सचिव द्याल बहादुरे, प्रदेश उपाध्यक्ष अण्णा रोखडे,रिपाई कल्याण जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, युवाध्यक्ष जय जाधव, डोंबिवली शहरप्रमुख अंकुश गायकवाड, माजी महापौर राजेंद्र देवळेकर, रमेश जाधव, रिपाईचे जिल्हा अध्यक्ष रमेश बर्वे, जिल्हा उपाध्यक्ष सलीनी गोंडगे, रिपाई पदाधिकारी दिनेश साळवे,विठ्ठल खेडेकर,तुकाराम पवार, समाधान तायडे,वसंत टेकाडे,धम्मपाल सरकटे,मंगेश कांबळे, रवी म्हात्रे, वाल्मिकी कांबळे, विश्वास शमशेर,दिलीप म्हात्रे,आदी उपस्थित होते. यावेळी ते पुढे म्हणाले, शिवसेना, भाजप युती झाली पाहिजे, अन्यथा मतांचं विभाजन होऊन दोन्ही काँग्रेसला फायदा होईल आणि सर्वाधिक नुकसान शिवसेनेचं होईल. त्यामुळे दोघांनी एकत्र यावं यासाठी मी प्रयत्नशील आहे. उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. मुंबईत मराठी माणसानं उद्योग करण्याची भूमिका घेतली पाहिजे. आपण जी कामं करत नाही, ती करायला उत्तर भारतीय लोक येतात. त्यामुळं सरकार मराठी तरुणांना स्किल डेव्हलपमेंट शिकवणार आहे. मी तीन वेळा लोकसभेत होतो, त्यामुळे पुन्हा लोकसभेत जाण्याची इच्छा आहे. यासाठी शिवसेनेच्या कोट्यातली दक्षिण मुंबईची जागा मागितली आहे. युती झाली तर आरपीआयची मतं त्यांना मिळतील. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईची जागा मला मिळावी अशी मागणी आहे. शरद पवार लोकसभेत येणार असतील तर आनंद आहे. मी लोकसभेत गेलो तर ते राज्यसभेत काय करतील? पवार साहेब माढ्यातून उभे राहणार अशी माहिती आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत