मुंबई : पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी धडक मोहिम सुरु केली आहे. लाच घेताना सापळा रचून पकडण्यात आलेल्या तिघा पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी निलंबित केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात गुरुवारी बोलावलेल्या एका विशेष बैठकीत पोलीस आयुक्तांनी लाचखोरीबाबत पुन्हा एकदा सर्वांना ताकीद दिली आहे.
कुलाबा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक श्रीमणिक होळकर आणि सागरे टकले यांनी तक्रारदार आणि आरोपी अशा दोघांकडून पैसे उकळले होते. याबाबत तक्रारी आल्यावर त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. या चौकशीत ते दोघेही दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.
होळकर आणि टकले यांना एका व्यावसायिकाने केलेली तक्रार खोटी असल्याचे माहिती होते. असे असतानाही या तक्रारीचा गैरफायदा घेत त्यांनी दुसऱ्या व्यावसायिकाला गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. व कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपये घेतले. तसेच तक्रार करणाऱ्याकडून दोघांनी ३० हजार रुपये घेतले. या दोन्ही व्यावसायिकांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यावर या दोघांचे हे बिंग फुटले. आता त्यांना निलंबित करण्यात आले आहे.