महाराष्ट्र

अनधिकृत पार्सलची वाहतूक केल्यास परवाना निलंबनाबरोबरच बस जप्तीची कारवाई होणार – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा इशारा 

प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षेबाबत मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, एसटीच्या सुरक्षिततेबाबतही गंभीर दखल

मुंबई, दि. २५ : राज्यातील खासगी प्रवासी ट्रॅव्हल्स बसेसनी प्रवाशांची वाहतूक करताना सुरक्षिततेबाबत संपूर्ण दक्षता घ्यावी. तसेच खासगी प्रवासी बसेसनी कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत कुरिअर वाहतूक, अनधिकृत पार्सल वाहतूक किंवा अनधिकृत लगेज वाहतूक करु नये. अशी वाहतूक करताना खासगी प्रवासी ट्रॅव्हल्स बसेस आढळल्यास त्यांच्यावर परवाना निलंबनाची तसेच जागेवर बस जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज विविध प्रवासी वाहतूक संघटनांना दिला. एसटी बस वाहतुकीच्या सुरक्षिततेचा विषयही महत्त्वाचा असून एखाद्या एसटी बसचालकाने अथवा वाहकाने अनधिकृत पार्सलची वाहतूक केल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम त्याच्यावर बदलीची आणि दुसऱ्यांदा थेट बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री श्री. रावते यांनी आज एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

रायगड जिल्ह्यात एसटी बसमध्ये नुकत्याच सापडलेल्या स्फोटकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी बससह खासगी ट्रॅव्हल्स, स्कूल बस, इतर प्रवासी वाहतूक साधने यांच्या सुरक्षीततेसंदर्भात आज मंत्रालयात मंत्री श्री. दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त निमिष मिश्र, एस. वीरेश प्रभू, पोलीस अधीक्षक विजय पाटील, एसटी महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मनोज लोहिया यांच्यासह विविध बस मालक संघटना, स्कूल बस मालक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रत्येक एसटी बस स्थानकावर पोलीस चौकीची उभारणी

मंत्री श्री. रावते म्हणाले की, रायगड जिल्ह्यात एसटी बसमध्ये नुकत्याच सापडलेल्या स्फोटकाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या तसेच खासगी ट्रॅव्हल्सच्या सुरक्षित बस वाहतुकीचा प्रश्न समोर आला आहे. एसटी महामंडळाने परिपत्रक काढून कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत पार्सलची वाहतूक करु नये, अशा सूचना चालक आणि वाहकांना दिल्या आहेत. पण त्याबरोबरच कोणी अशी वाहतूक करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी सूचना मंत्री श्री. रावते यांनी यावेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली. एसटी बसने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर पोलीस चौकीची उभारणी करण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री श्री. रावते यांनी यावेळी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील म्हणाले की, प्रवाशांची सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून यासाठी गृह आणि परिवहन विभागाने समन्वयाने काम करावे. दुर्दैवाने प्रवासी वाहतुकीत स्फोटके सापडण्यासारखी किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावेळी चालक तथा वाहकाने नेमके काय करावे, कोणाशी संपर्क साधावा आदी बाबतही एक सूचनावजा परिपत्रक तथा एसओपी निर्गमित करण्यात यावा, असेही मंत्री डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!