ठाणे

१२ वीच्या परीक्षेच्या काळात डोंबिवलीत रिक्षा बंद आंदोलन…  

डोंबिवली : ( शंकर जाधव ) एकीकडे १२ वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मोफत रिक्षा प्रवास दिला जात असताना दुसरीकडे मात्र रिक्षा बंद आंदोलन झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. रिक्षा भाडे वाढीच्या तक्रारी आल्याने वाहतूक पोलीसांनी कारवाईचे बडगा उगारला असताना ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.काही वेळ वपोनी एस.एन.जाधव आणि युनियनच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाल्यावर रिक्षां बंद आंदोलन मागे घेण्यात आले.

        उपप्रादेशिक परिवहन विभागाने शहरातील विविध भागात अधिकृत रिक्षा भाडे फलक लावणे आवश्यक आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळ लाल बावटा रिक्षा चालक-मालक संघटनेने फलक लावले होते.यावर इतर रिक्षा चालक –मालक संघटनेने आक्षेप घेतला.तर सोमवारी सकाळपासून वाहतूक पोलिसांनी जादा भाडे आकारणी, जवळचे भाडे नाकरणे, विना परवाना रिक्षा चालवणे, चौथ्या सीटवर प्रवाश्याला बसवणे यावर वाहतूक पोलीस निरीक्षक एस.एन.जाधव आणि कर्मचाऱ्यांनी केळकर पथावरील दंडात्मक कारवाई केली. येथील रिक्षा थांब्यावरील रिक्षाचालकांनी सदर कारवाईला विरोध करत सकाळी साडे दहा ते दुपारी १ वाजेपर्यत रिक्षा बंद आंदोलन केले.सदर ठिकाणी रिक्षा युनियनचे पदाधिकारी संजय देसले, दत्ता माळेकर, संजय मांजरेकर यांनी पोलीस निरीक्षक जाधव यांना कारवाईबाबत जाब विचारला.लाल बावटा रिक्षा चालक-मालक युनियनचा रिक्षा भाडे संदर्भातील दरफलक अधिकृत नसून उपप्रादेशिक परिवहन विभागाने अधिकृत फलक लावावे अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.तसेच चौथ्या सीटवर प्रवाश्यांना बसविले जाईल,वाहतूक पोलिसांनी खुशाल कारवाई करून दाखवावी असे संजय देसले यांनी सांगितले.जो नियम रिक्षाचालकांना आहे तोच नियम मारुती ओमनीवर कारवाई का करत नाही यांचा जाब विचारला.तर पोलीस निरीक्षक जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, वाहतूक पोलीस नियमानुसार कारवाई करत आहेत.प्रवाश्यांनी वाहतूक पोलिसांकडे तक्रार केल्यास त्याची शहानिशा करून त्यावर कारवाई केली जाईल.दरम्यान वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेत विविध रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. उपप्रादेशिक परिवहन विभागाने अधिकृत दरफलक लावल्यानंतर कारवाई करायला करणे अपेक्षित होते. वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई अन्यायकारक आहे असे या बैठकीत संजय मांजरेकर यांनी सांगितले.

  आरटोओला डोंबिवलीत रिक्षाभाडेचे अधिकृत दरफलक लावल्यास मुहूर्त मिळाला …

     अनेक महिन्यापासून रिक्षा भाडेचे दरफलक शहरातील मुख्य चौकात लावण्यात यावे अशी मागणी विविध रिक्षा संघटनेने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे केली होती. मात्र चर्चेनंतर हा विषय अमंलात आणण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने कानाडोळा केला होता. मात्र सोमवारी रिक्षाचालकाने बंद पुकारल्याने याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. आरटोओला डोंबिवलीतील रिक्षाभाडेचे अधिकृत दरफलक लावल्यास मुहूर्त मिळाला आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय ससाणे यांना विचारले असता त्यांनी डोंबिवलीत अधिकृत दरफलक लावले जाणार असल्याचे सांगितले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!