मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कवितांचे कविसंमेलन चांगलेच रंगले. देश विदेशातून आलेल्या १३० कवितांपैकी निवडक ६५ कवींना यात सादरीकरणासाठी संधी देण्यात आली होती. इयत्ता ६वी ते वयाची ७५ पार केलेल्या विविध गटातील सावरकरप्रेमींनी यात सहभाग घेतला, तसेच स्वातंत्र्यवीरांच्या वेगवेगळ्या पैलूंना साकार करत या आत्मार्पण दिनी त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रसाद कुलकर्णी, जयेश मेस्त्री, स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, सह कार्यवाह डॉ. सुमेधा मराठे, गुरुदत्त वाकदेकर, चंद्रशेखर परांजपे, दिलीप सावंत, अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर ही एक व्यक्ती नसून विचारधारा आहे तसेच त्यांच्या आणि संत ज्ञानेश्वर यांच्या जगण्यात एक साधर्म्य आहे. दोघांनीही वयाच्या १६व्या वर्षांपर्यंत अलौकिक साहित्य तर लिहिलेच पण ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली तसेच आत्मार्पण स्वातंत्र्यवीरांनी घेतले. स्वातंत्र्यवीरांना ब्रिटिशांनी शिक्षा दिली पण आपल्या स्वातंत्र्योत्तर काळात आपण त्यांना उपेक्षा दिली, अशी खंत सुप्रसिद्ध कवी, गीतकार, शुभेच्छापत्रांचे सौदागर, आनंदयात्री प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
आजच्या सिनेगीतकारांना चित्रपट निर्माते विविध मनोहारी नेत्रसुखद अशा पर्यटन स्थळांवर पाठवतात, विविध सुखसोयी पुरवतात, पण त्यांना मनाजोगतं लिहिता येत नाही. पण जेव्हा सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली, ते हसतमुखाने बंदिवान झाले आणि विपरीत परिस्थितीत निर्माण केले “कमला” सारखे अजरामर महाकाव्य, असे उद्गार सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक लेखक कवी तसेच सावरकरांचे विचार जनमानसांत पोहचवणारे जयेश मेस्त्री यांनी काढले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार जनमानसात रुजवितानाच नव्या पिढीनेही ते आत्मसात करावे तसेच त्यांना अनुरूप असे देशहिताचे कार्य करावे, असे आवाहन स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी व्यक्त केले.
यावेळी कविसंमेलनात सहभागी झालेल्या कवी/कवयित्रींना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध निवेदक दिनेश अडावदकर यांनी खुसखुशीत शैलीत कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. गुरुदत्त वाकदेकर यांनी उत्तमरित्या या कविसंमेलनाचे आयोजन केले याची ग्वाही उपस्थित कवी आणि रसिक श्रोते देत होते. याच कविसंमेलनात सादर झालेल्या सावरकरांच्या कवितांचे “स्मरण क्रांतिसुर्याचे” ह्या ईबुकचे प्रकाशनदेखील यावेळी सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.