कल्याण : गेल्या पाच वर्षांपासून सातबाऱ्यावरील नवीन शर्त अट शिथिल करण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची शासन दरबारी फसगत होत असल्याने कल्याण तालुक्यातील रुंदे गावातील २७ शेतकऱ्यांनी गावातच 1मार्च पासून साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शिवसेनेच्या शैलेश वडनेरे यांनी पाठिंबा दिला आहे.
कल्याण तालुक्यातील मौजे रुंदे येथील एकूण २७ सर्व्हे क्रमांकावर नवीन शर्त अशी चुकीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ही चुकीची नोंद रद्द व्हावी यासाठी फळेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन आणि जेष्ठ पत्रकार सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सर्व शेतकऱ्यांनी कल्याण तहसीलदार, प्रांताधिकारी आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना गेल्या पाच वर्षांपासून विनवण्या आणी अनेक पत्रव्यवहार करून न्याय मागितला आहे. शिवाय २०१७ साली या सर्व शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य दिनी गावच्या स्मशानभूमीत मुंडण आंदोलन देखील केले होते.
त्याच प्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत रुंदे-आंबीवली यांनी ग्रामसभेत या विरोधात ठराव हि घेण्यात आला होता. त्यावेळी फक्त शासनाने आश्वासना पलीकडे कोणतीही कार्यवाही केलेली नाही. कल्याण तहसीलदार ,प्रांत अधिकारी आणी जिल्ह्याधिकारी या बाधित शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने अखेर या सर्व बाधित शेतकऱ्यांनी रुंदे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
या साखळी उपोषणास रुंदे गावातील जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर चुकून लागलेली नवीन शर्थ अशी नोंद कमी करण्यासाठी सुमारे 27 शेतकरी व त्यांचे कुटुंबीय सुद्धा या साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत.
या उपोषणास शिवसेनेचे बदलापूर येथील नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी या नवीन शर्थ बाधित उपोषकर्ते शेतकऱ्यांची भेट घेतली. व शिवसेना आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून या बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे बोलतांना सांगितले.