पुणे : पाणी परवान्यातील नावे कमी करून मुलींची नावे लावण्यासाठी केलेला अर्ज पुढे पाठविण्यासाठी २ हजारांची लाच स्विकारताना वडगाव पाटबंधारे शाखेतील कनिष्ठ लिपीकाला अॅन्टी करप्शनच्या पथकाने त्याच्या कार्यालयातच रंगेहात पकडले.
सिकंदर शहाबुद्दीन शेख (५३, कनिष्ठ लिपीक, वडगाव पाटबंधारे शाखा) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी ६३ वर्षीय व्यक्तीने अॅन्टी करप्शनकडे तक्रार केली.
तक्रारदार यांच्या पाणी परवान्यावर त्यांचे सासरे व साडू यांची नावे होती. ती नावे कमी करून मुलींची नावे लावण्यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज पुढे पाठविण्यासाठी वडगाव पाटबंधारे शाखेतील कनिष्ठ लिपीक शेख याने त्यांच्याकडे २ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शनकडे यासंदर्भात तक्रार केली. त्याची पडताळणी केल्यावर अॅन्टी करप्शनच्या पथकाने वडगाव निंबाळकर येथील शाखा कार्यलायत गुरुवारी सापळा रचला. शेख याला २ हजारांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले.
ही कारवाई अॅन्टी करप्शनचे पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्चना दौंडकर, राजू चव्हाण व पोलीस कर्मचारी शेळके, कादबाने यांच्या पथकाने केली.