अलिबाग : अलिबाग कारागृहात बिस्किटांच्या पिशवीत मोबाईल सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती खुद्द जेलर ए. टी. पाटील यांनी दिली. या घटनेवरून कारागृहाची सुरक्षा कुचकामी असल्याचे समोर आले आहे. आश्चर्यजनक म्हणजे बंदी असतानाही कारागृहात खाद्यपदार्थ, बिस्किटे यांसह अन्य वस्तू नातेवाईक व मित्रमंडळींकडून कारागृहातील बंदींना दिल्या जातात, अशी माहिती मोबाईलबद्दल सांगताना पाटील यांनी दिली.
कारागृहात मोबाईल, सिम कार्ड, नशेच्या वस्तू वारंवार सापडत असल्याने कारागृहाची सुरक्षा चोख करण्यात आल्याचा दावा कारागृह प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र कारागृहाची सुरक्षा किती कुचकामी आहे, हे गेल्या आटवड्यात कारागृहात आलेल्या मोबाईलमुळे समोर आले आहे. माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहाच्या आत साधी माचिसची काडीसुद्धा येता काम नये, असा सक्त आदेश आहे. गुन्हेगार असले तरी मानवी नैतिकता म्हणून कारागृहातील बंदींसाठी राज्यातील कारागृहात कँटिंग सुरू करण्यात आले आहेत. नातेवाईकांनी केलेल्या मनिऑर्डरद्वारे कैद्यांना ३ हजार रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ कैदी कँटिंगमधून खरेदी करतात. असे असताना मुलाखतीच्या वेळी एका कैद्याचे नातेवाईक पिशवीत बिस्कीट व अन्य वस्तू घेऊन अलिबाग कारागृहात आले. मुलाखत झाल्यानंतर कैद्याच्या नातेवाईकाने सदर पिशवी कैद्याला देण्यासाठी कर्तव्यावरील अंमलदाराकडे दिली. सदर पिशवीची झडती घेतली असता त्यात मोबाईल आढळला. अंमलदाराने ती पिशवी जेलर पाटील यांच्याकडे नेली. पाटील यांनी कैद्याच्या नातेवाईकाला विचारले असता, मुलाखतीच्या वेळी नजर चुकीने मोबाईल पिशवीत राहिला आणि पिशवी कैद्याला देण्यासाठी पोलिसांकडे देण्यात आली, असे कैद्याच्या नातेवाईकाने जेलर ए. टी. पाटील यांना सांगितले.
मुळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ आत येता कामा नये. असे असतानाही नजर चुकीने बिस्किटांसोबत मोबाईल कारागृहात नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, मोबाईल कारागृहाच्या आत गेला होता. सदर माहिती मिळाल्यानंतर मोबाईलचे बिंग फुटले. मोबाईलबाबात विचारले असता जेलर पाटील म्हणाले की, बिस्किटांच्या पिशवीतून नजर चुकीने मोबाईल राहिला होता, असे पाटील यांचे म्हणणे आहे. याचाच अर्थ कारागृहाचे नियम थांब्यावर बसवून बिनदिक्कतपणे खाद्यपदार्थ अलिबाग कारागृहाच्या आत जातात आणि यापूर्वीही खाद्यपदार्थांबरोबर नजर चुकीने मोबाईल व अन्य वस्तूही गेल्या असतील हे नाकारता येऊ शकत नाही.