डोंबिवली ( शंकर जाधव ) दहा वर्षांपूर्वी मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया याचा फारसा वावर नसल्यामुळे पालक व विद्यार्थी यांचा अभ्यासाविषयक थेट संवाद होत होता. परंतु सोशल मीडियाचा वापर अती प्रमाणात होऊ लागला तेव्हा हा संवाद संपल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नेटवरून अभ्यास, नेटवरून रिपोर्ट कार्ड,अभ्यासात काही अडलं तर नेट नाहीतर व्हाट्स अँप फेसबुकवर २४ तास उपलब्ध असलेले ग्रुप सगळं काही नेटवर उपलब्ध असते.परंतु या नेटचा वापर करता करता अनेक विद्यार्थी सोशल मीडियाच्या कधी आहारी जातात ते कळत नाही. भारतातील ४८ टक्के शाळकरी मुलांचा अभ्यासासाठी सोशल मीडियाचा वापरकरत असतात. याचा विपरीत परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत असल्याचे निरीक्षण मुंबई येथील निरायम गाईडन्स क्लीनिकतर्फे व्यक्त करण्यात आले आहे.
शालेय मुलांचा सर्वांगीण विकास व विलंब, शारीरिक अपंगता, डिस्लेक्सिया, स्वमग्नता, सेरेब्रल पाल्सी, मुलांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी निरामय गाईडन्स क्लीनिक मुंबई, नवी मुंबई व लखनो येथे कार्यरत आहे. याविषयी अधिक माहिती देताना निरामय गाईडन्स क्लीनिकच्या संचालिका व बालविकास तज्ञ डॉ. अंजना थडानी सांगतात, सोशल मीडियातील विविध माध्यमे मानवाला वास्तविक जगापासून दूर घेऊन जात आहेत. याच्या वापराने लोक भ्रामक विश्वात राहण्यावर विश्वास ठेवत आहेत, परंतु या समस्येवर योग्य निदान शोधण्याकडे कोणाचे लक्ष नाही. युवकांसोबत लहान मुले सुद्धा या भ्रामक जगात गुंग होत आहेत. समाजाच्या दृष्टीने ही चांगली लक्षणे नाहीत.सोशल नेटवर्किंगमुळे युवक आत्मकेंद्रित होत असून स्वत:ची स्तुती ऐकणे त्यांना आवडू लागलेले आहे. माझ्या पोस्टला अथवा लुकला ( पेहराव, हेअर स्टाईल ) माझ्या मताला ( ओपिनियन ) सोशल मीडिया व्हॅल्यू किती आहे हे बघण्याची चढाओढ मुलांमध्ये लागली असून पालकांना याविषयी माहिती असूनही त्यावर संवाद साधला जात नाही, ही आजची शोकांतिका आहे.म्हणूनच आम्ही परीक्षेच्या काळात मुलांना व पालकाना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहोत. चीन, तैवान आणि दक्षिण कोरिया या देशांनी अलीकडेच इंटरनेटच्या व्यसनाला एक मानसिक आजार म्हणून मान्यता दिली आहे. सोशल नेटवर्किंगचे व्यसन सोडणे अतिकठीण असल्याचा दावा शिकागो विद्यापीठातील संशोधकांनी केला असून भारतामध्ये याविषयी अधिक चर्चा होणे गरजेचे आहे.
मुंबईतील ७०.८% विद्यार्थी कुठेही असले तरी १५ ते १८० मिनिटे सोशल मीडियावर आपला वेळ घालवतात. ४८.२% मुलेशाळेच्या अभ्यासासाठी सोशल मीडियाचा वापर करतात.४७.७% मुलं अभ्यासासाठी व्हिडिओ चॅट करतात. त्यातले २२.२% मुलं व्हिडिओ चॅटिंगद्वारे नवीन छंद शिकतात. १७.७% मुलं शाळेतल्या चाचणी परिक्षांची तयारी आणि २०.८ % मुलं शाळेनं दिलेल्या असाइनमेण्ट्सा पूर्ण करण्यासाठी व्हिडिओ चॅटिंगचा आधार घेतात अशी माहिती टाटा कन्सलटन्सी सव्हिसेस अर्थात टीसीएसने देशभरातल्या पंधरा शहरातल्या माध्यमिक शाळेत जाणाऱ्या १३,०० शाळकरी मुलांच्या सर्वेक्षणातून समोर आणली आहे. आपल्याच आई बाबांशी, आजी आजोबांशी व्हिडिओ चॅटिंगद्वारे संपर्क साधून बोलणाऱ्या मुलांच प्रमाण थोडथिडकं नसून ५५.६ टक्के आहे. शाळेच्या अभ्यासाबाबत, असाइनमेण्टस बाबत एकमेकांशी चर्चा करता यावी यासाठी मुलं व्हॉटसअॅपवर ग्रूप करता आहेत अशी माहिती या सर्वेक्षणात आढळून आली आहे.