मुंब्रा : ( प्रतिनिधी) खाडी किनारा लाभलेल्या मुंब्रा, डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात झाडाझुडपात हातभट्टीच्या दारूच्या निर्मितीच्या भट्ट्या लागत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा, मुंब्रा पोलीस आणि डायघर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत तब्बल 6 लाख 15 हजाराची हातभट्टीची दारू हस्तगत करण्यात आली. वारंवार हातभट्ट्यांवर मुंब्रा आणि डायघर पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येत. मात्र हि संयुक्त कारवाई हि आतापर्यंतच्या कारवाईत सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांविरोधात मुंब्रा आणि डायघर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातीळ फरारी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
ठाणे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे याना मंगळवारी मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंब्रा आणि डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देसाई गावाच्या बाजूला जंगलात खाडीच्या किनाऱ्यावर गावठी हातभट्टी दारू काढण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळाली होती. खाडी किनारा असलेल्या मुंब्रा आणि डायघर पोलिसांच्या सोबत गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांना 6 लाख 15 हजार 620 रुपयांची दारू हस्तगत केली. दरम्यान छापेमारीची चाहूल लागताच आरोपी अतुल केणे, दीपक केणे, किरण केणे, राहुल केणे, रुपेश केशव म्हात्रे, सचिन तुकाराम पाटील, प्रशांत बुधाजी रोकडे सर्व रा. देसाई, मुंब्रा यांनी पलायन केले. पोलीस पथकाला आरोपी सापडले नाहीत मात्र मोठ्या प्रमाणात निर्मित हातभट्टीची दारू हस्तगत करण्यात आली. मुंब्रा खाडी आणि देसाई गाव येथील कारवाईत शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून छाप्यात 2 लाख 65 हजार 120 किमतीची आणि मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 लाख 50 हजार 500 रुपयांची दारू हस्तगत करण्यात आली. दरम्यान पोलीस पथकाने हातभट्टीचे साहित्य , ड्रम , कच्चा माल आणि साहित्य मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस पथकाला पाहून पलायन केलेल्या आरोपीं विरोधात डायघर पोलीस भादवी 328, सह मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 65(ई) (फ) प्रमाणे व मुंब्रा पोलीस ठाण्यात भादवी कलम 328 मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 65(ई) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविराज कराडे,क्षीरसागर, शिंदे आणि डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मालेकर आणि अन्य सहकारी अधिकारी यांच्या मदतीने सर्वात मोठी कारवाई करण्यात आली.