डोम्बिवली ( संतोष पडवळ) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडिया इमारतीला जोडणारा हिमालया पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये डोंबिवलीच्या तीन परिचारिकांनी आपले प्राण गमावले. अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे अशी त्यांची नवे असून त्या मुंबईच्या गोकुळदास तेजपाल अर्थात जीटी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होत्या.
सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर पूल पडल्याचं समजताच जीटी हॉस्पिटल प्रशासन रुग्णांच्या सुश्रुषेसाठी सज्ज झालं. मात्र, याच हॉस्पिटलला त्यांच्याच नर्सचे मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ आली.
जीटी रुग्णालयातील एका वरिष्ठ नर्सिंग स्टाफने दिलेल्या माहितीनुसार, अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे रात्री ८ वाजता नाईट शिफ्टला येण्यासाठी निघाल्या होत्या. तिघीही जणी डोंबिवलीला राहत होत्या.