डोंबिवली : लोकसभा निवडणुकीत जनता कल्याण लोकसभेतील आणि ग्रामीण भागातील रहिवासी म्हणून मला पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामूळे कल्याण लोकसभेेतील जनता या निवडणुकीत आपल्या पाठीशी उभी राहील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण लोकसभेचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या 31 वर्षांत याठिकाणी स्थानिकांऐवजी ठाण्यातील उमेदवार लादण्यात आले. मात्र राष्ट्रवादीने माझ्यासारख्या स्थानिक नेत्याला उमेदवारी देऊन हा अन्याय दूर केला आहे. भलेही आपण ठाणे तालुक्यात राहत असलो, ठाणे महापालिकेत निवडून आलो असलो तरीही कल्याण लोकसभा मतदारसंघ हा अंबरनाथपासून कळवापर्यंत पसरला आहे. मी शिळफाटा परिसरातील देसाई गावात वास्तव्याला असून हा भाग कल्याण ग्रामीण मतदारसंघात येतो आणि माझे वडील शेतकरी असून आपले शिक्षण पडले गावातील सरस्वती शाळेत झाले असून देसाई सेवा सहकारी सोसायटीचे आपल्याकडे अध्यक्षपद असल्याचेही पाटील म्हणाले.