डोंबिवली :- ( शंकर जाधव ) कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास स्कायवॉकवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन ते तीन अज्ञात इसमांनी धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात पाटील जबर जखमी झाले असून एका खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. हल्ल्यामागील काय अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सुभाष पाटील हे ठाण्यात राहत असून नेहमीप्रमाणे कार्यालयाची वेळ संपल्यानंतर घरी जात होते. स्कायवॉकवर गेल्यावर अचानक तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन ते तीन अज्ञात इसमांनी पाटील यांना अडवले. पाटील यांना काही समजण्याच्या आत हल्लेखोरांनी त्यांच्याकडील धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात पाटील यांच्या पोटावर आणि छातीवर जखमा झाल्या.हल्लेखोर स्टेशनच्या दिशेने पळून गेले असतान पाटील यांच्या मदतीला कोणीही आले नाही. पाटील यांनी त्यांच्या मोबाईलवरून एका अधिकाऱ्याला घटनेची माहिती दिली. तो अधिकारी तत्काळ स्कायवॉकवर धावत आला. त्या अधिकाऱ्याने पाटील यांना ताबडतोब एका खाज्गु रूग्णालयात दाखल केले.या घटनेचे माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्याने समजताच त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली. काही राजकीय नेतेमंडळीनी रूग्णालयात धाव घेतली. रामनगर पोलीस ठाण्याचे व्पोनी विजयसिंग पवार यांनी रुग्णालयात जाऊन पाटील यांच्याकडून घडलेल्या घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेने पालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली असून पालिका अधिकारीपुरते घाबरलेले आहेत.
रामनगर पोलीस या घटनेतील प्रत्यक्षदर्शीकडून माहिती घेत असून या हल्ल्यामागे कोण आहे याचा तपास सुरु झाला आहे.पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाई करताना चार ते पाच असा ग्रुप करून कारवाई करावी असे आदेश पालिका अधिकारी देणार असल्याचे समजते.तसेच पोलीस संरक्षणाची मागणी करणार असल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.