महाराष्ट्र

मतदान केंद्रांवर यंदा ‘अत्यावश्यक सुविधांची’ संख्या दुप्पट

मेडिकल किट, सावलीची व्यवस्था, स्वयंसेवकांची मदत, लहान मुलांसाठी पाळणाघराची सुविधा

मुंबई, दि. 28 : लोकसभा निवडणुकांकरिता मतदान केंद्रांवर ‘अत्यावश्यक किमान सुविधांची’ संख्या यावर्षी दुप्पट करण्यात आली आहे. मेडिकल किट, मतदान केंद्रांवर सावलीची व्यवस्था, दिव्यांग  तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत, लहान मुलांसाठी पाळणाघर, अंध आणि दिव्यांग मतदारांच्या वाहतुकीची व्यवस्था, रांगेचे व्यवस्थापन या सुविधा यावर्षी नव्याने करण्यात येणार आहेत.

मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध उपाययोजना केल्या जातात. गेल्या निवडणुकीत मतदान केंद्रांवर सुमारे सात प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये रॅम्पची व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीजेची उपलब्धता, मदत कक्ष, स्वच्छतागृहांची सुविधा या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. यावर्षी त्यामध्ये दुपटीने वाढ करुन 15 प्रकारच्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

नव्याने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेतील मेडिकल किटमध्ये वेदनाशामक औषध, बॅण्डेज, ओआरएस पावडर, जखमेवर लावण्यासाठी पट्टी आदी साहित्याबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर एक वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध असणार आहे. वाढत्या तापमानाची दखल घेताना मतदान केंद्रांवर महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि महिलांसोबत असलेल्या लहान मुलांचा उन्हापासून बचावाकरिता, सावलीसाठी मंडप टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मतदारांच्या सहाय्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक केली जाणार आहे. त्यामध्ये राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट आणि गाइड विद्यार्थ्यांची मदत घेतली जाईल. हे विद्यार्थी मतदार रांगेचे व्यवस्थापन करण्याबरोबरच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी सहाय्य करतील. या स्वयंसेवकांसाठी पाणी आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महिला मतदारांसोबत आलेल्या लहान मुलांकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था केली जाणार आहे. या ठिकाणी एक प्रशिक्षित सहायक या मुलांची काळजी घेण्यासाठी नेमण्यात येणार आहे. ज्या अंध आणि दिव्यांग मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे माहिती देऊन मतदानासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी केली असेल अशा मतदारांसाठी घर ते मतदान केंद्र वाहनाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसेल तेथे खासगी वाहन भाड्याने घेऊन या मतदारांची ने-आण करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.

प्रत्येक मतदान केंद्रावर तीन रांगा असतील. त्यामध्ये एक रांग पुरुषांसाठी, दुसरी महिलांसाठी आणि तिसरी ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांसाठी असणार आहे. रांगेतील दोन महिला मतदारांनी मतदान केल्यानंतर एका पुरुष मतदाराला मतदानासाठी आत सोडले जाईल. मात्र ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना प्राधान्य देण्यात येईल.

या सोबतच मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदारांना माहिती देण्याकरिता पोस्टर्स लावणे, स्वच्छतागृहाची सुविधा, वीजेची उपलब्धता आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!