डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवलीच्या निवासी विभागात असलेल्या शंकर पार्वती या धोकादायक इमारतीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रशासन यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त आहे. तर दुसरीकडे पोलिस संरक्षणाअभावी या इमारतीवर पाडकामाची कारवाई होऊ शकणार नसल्याने या इमारतीत राहणाऱ्या 16 कुटुंबियांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
औद्योगिक निवासी विभागातील फेज 2 मधल्या आर एच – 98 या भूखंडावर शंकर पार्वती नामक तळ + 1 मजली ही जुने बांधकाम असलेली इमारत सद्याच्या घडीला अत्यंत जीर्ण झाली आहे. या इमारतीचे ठिकठिकाणी स्लॅबचे प्लास्टर कोसळून आतील गंजलेल्या सळ्या बाहेर पडल्या आहेत. या इमारतीत रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून जीव मुठीत धरून वास्तव्य करत आहेत. या संदर्भात औद्योगिक विकास महामंडळाचे डोंबिवली विभागीय कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांनी सदर इमारतीतील रहिवाश्यांना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात नोटीसा धाडल्या आहेत. सदर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट मे. भिरूड अँड असोसिएट्स यांनी केले आहे. सदर स्ट्रक्चरल ऑडीटरने ही इमारत राहण्यास सुरक्षित नसल्याचे कळविले आहे. त्यांनी सदर इमारत अतिधोकादायक असल्याचेही कळविले आहे. त्याप्रमाणे इमारत खाली करावी, अन्यथा इमारत पडून जिवीत वा वित्तहानी झाल्यास त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार राहणार व एमआयडीसी त्यास जबाबदार राहणार नसल्याचे कार्यकारी अभियंता ननवरे यांनी तेथिल रहिवाश्यांना नोटीसांद्वारे बजावले आहे. या व्यतिरिक्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या `इ` प्रभागक्षेत्र अधिकारी रविंद्र गायकवाड यांनीही 18 जानेवारी रोजी सदर इमारतीतील रहिवाश्यांना नोटीसा धाडल्या आहेत. सदनिका निवासी/बिगर निवासी वापराकरिता धोकादायक असल्यामुळें त्यातील वापर तात्काळ थांबवावा आणि विनाविलंब तोडून टाकावा. भविष्यात काही दुर्घटना घडल्यास होणाऱ्या नुकसानीस आपण स्वतःत जबाबदार राहणार असल्याचे प्रभागक्षेत्र अधिकारी गायकवाड यांनीही कळविले आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणाही व्यस्त असल्याने आयत्यावेळी या व अश्या धोकादायक इमारतींवर कारवाई करणार कोण ? असा सवाल उभा ठाकला आहे. कल्याण-डोंबिवलीत गेल्या 25 वर्षात 15 पेक्षा अधिक इमारती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये किती जणांचा बळी गेला याची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. मात्र त्या दुर्घटनांना जबाबदार असलेल्या बिल्डर, मालक, अधिकारी यापैकी कोणावरही कारवाई झाली नाही. या पार्श्वभूमीवर शंकर पार्वती या धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 27 गावांचा समावेश होण्यापूर्वी गेल्या वर्षी या परिसरात 357 धोकादायक तर 279 अतिधोकादायक इमारतीची नोंद करण्यात आली होती. यातील 34 अतिधोकादायक इमारतींवर पालिकाप्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असली तरी उर्वरित इमारतींमध्ये आजही रहिवासी वास्तव्य करत आहेत. त्यातच यंदा आणखी किती इमारती मोडकळीस आल्या आहेत, याची नोंद पालिकेकडे अद्यापि करण्यात आलेली नाही. यंदा पावसाळ्यापूर्वी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारतींवर पावसाळ्यापूर्वी कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांकडून दिले जातात. मात्र अद्यापही प्रभाग क्षेत्र कार्यालयांकडून या धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आलेले नसून अपुऱ्या कर्मचाऱ्यांचे कारण संबधित विभागाकडून देण्यात येत आहे.